Agriculture News : शेतकऱ्यांसाठी कृषी वैज्ञानिकांच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे शोध लावले जात आहेत. कृषी वैज्ञानिक पिकांच्या वेगवेगळ्या आणि सुधारित जाती विकसित करत आहेत. कृषी वैज्ञानिकांच्या या नवीन संशोधनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे.
अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अलीकडेच राज्यातील अकोला कृषी विद्यापीठाने एक नवीन लसूण वाण विकसित केले आहे.
लसूण हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला देखील कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. नगदी पिकाचा दर्जा प्राप्त असणारे हे पीक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होत आहे.
दरम्यान जर तुम्हीही लसणाची शेती करत असाल तर अकोला कृषी विद्यापीठाने नव्याने विकसित केलेले हे वाण फायद्याचे ठरणार आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नवीन लसुण वाण
मिळालेल्या माहितीनुसार अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीडीकेव्ही पूर्णा नावाचे नवीन लसूण वाण विकसित केले आहे. विशेष म्हणजे या नव्याने विकसित झालेल्या जातीला राज्य शासनाची मंजुरी देखील मिळालेली आहे.
तथापि या नव्याने विकसित जातीला केंद्राची मंजुरी मिळणे बाकी आहे. पण लवकरच ही मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर हे वाण राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल असे बोलले जात आहे.
खरे तर गेल्या चार वर्षांपासून कृषी विद्यापीठ या संशोधनात व्यस्त होते. आता मात्र हे संशोधन यशस्वी झाले असून लवकरच हे नवीन वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे लसणाचे विद्यापीठाचे पहिलेच वाण आहे. यामुळे विद्यापीठासाठी ही उपलब्धी अधिक खास ठरते.
या जातीबाबत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांना या जातीपासून हेक्टरी 125 क्विंटल पर्यंतचे एवरेज उत्पादन मिळू शकते. अर्थातच गोदावरी, श्वेता आणि भीमा लाल या जातीपेक्षा हा नव्याने विकसित वाण अधिक उत्पादन देणारा ठरणार आहे.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात हा वाण लागवडीसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.