Agriculture News : 16 जुन 2024 ला 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाला लवकरच 18व्या लोकसभेच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने तयारी देखील सुरू केली आहे. लवकरच निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आणि आचारसंहिता लागू होणार आहे.
मात्र, आचार संहिता लागू होण्यापूर्वीच आज केंद्रातील मोदी सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आज पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव आणि निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयांची प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला असून कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. त्यात प्रतिक्विंटल 285 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे ताग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने आज गेल्या हंगामाच्या तुलनेत 2023-24 या हंगामासाठी तागाच्या मिनिमम सपोर्ट प्राईस मध्ये अर्थातच हमीभावामध्ये मोठी वाढ केलेली आहे. गेल्या हंगामात तागाचा हमीभाव 5,050 रुपये एवढा होता आता मात्र हा 5335 प्रतिक्विंटल एवढा झाला आहे.
तागाची लागवड भारताच्या बंगाल, बिहार, ओडीसा, आसाम आणि उत्तर प्रदेश येथील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. या भागातील जवळपास 16 लाख एकर जमिनीवर तागाची लागवड होत आहे. अर्थातच बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. यामुळे केंद्राच्या या निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही दिली मोठी भेट
आज मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र आता यामध्ये चार टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. अर्थातच महागाई भत्ता आता 50% एवढा होणार आहे. पण महागाई भत्त्यात झालेली ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे.
म्हणजेच आता जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय घर भाडे भत्ता देखील वाढवण्यात आला आहे. घरभाडे भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंत ची वाढ झाली आहे. एवढेच नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 20 लाखाऐवजी 25 लाख रुपये एवढी रक्कम ग्रॅज्युटी म्हणून मिळणार आहे.
उज्वला योजनेला मिळाली मुदतवाढ
केंद्राने आज उज्वला योजनेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. उज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरवर केंद्र शासनाच्या माध्यमातून 300 रुपये एवढी सबसिडी दिली जात आहे. म्हणजे सध्या 903 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलेला फक्त 603 रुपयात मिळत आहे.
योजना 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार होती. आता मात्र ही योजना 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.