50 Hajar Protsahan Anudan Yadi : गेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी करतेवेळी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेतला.
मात्र या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या सरकारला आपल्या कार्यकाळात करता येणे अशक्य बनले. दरम्यान आता राज्यात एकनाथ शिंदे गट शिवसेना अर्थातच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचे सरकार सत्तारूढ झाले असून या सरकारने गेल्या सरकारचा नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 पर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
शिंदे सरकारने 2017 18, 2018 19, 2019 20 या तीन वर्षे पैकी किमान दोन वर्ष नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल असं घोषित केल असून त्याची अंमलबजावणी दिवाळीच्या पूर्व संध्या पासून सुरू झाली आहे. मध्यंतरी ग्रामपंचायता निवडणुका लागल्याने अनुदानाची दुसरी यादी येण्यास विलंब झाला होता.
मात्र निवडणूक संपल्यानंतर तात्काळ सरकारकडून या प्रोत्साहन अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आता आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लगेचच अनुदान दिलं जाणार आहे.
या दुसऱ्या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून जळगाव जिल्ह्यातील 57 हजार 231 शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. अशातच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष बिडवई यांनी दुसऱ्या यादीत आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या विशिष्ट क्रमांकासह जवळच्या सीएससी सेंटर अर्थातच आपले सेवा केंद्र गाठून आधार प्रमाणीकरन करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील 57,231 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी जिल्हा बँकेचे 45 हजार 88 तर राष्ट्रीयकृत बँकेचे 12,143 शेतकरी खातेदार आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख शेतकरी बांधव नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे असून उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच पोर्टलवर प्रसिद्ध होतील अशी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.
निश्चितच नववर्षाला राज्यातील हजारो शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याने शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या यादीतही आलेली नाहीत त्या शेतकऱ्यांची नावे लवकरच तिसऱ्या यादीत प्रसिद्ध केले जातील अशी माहिती समोर येत आहे. निश्चितच अडीच वर्षांपूर्वी केलेली घोषणा अखेर सत्यात उतरली असून आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे.
तालुकानिहाय प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या
अमळनेर 5448
भडगाव 3067
भुसावळ 2421
बोदवड 919
चाळीसगाव 3968
चोपडा 3918
धरणगाव 3630
एरंडोल 2832
जळगाव 3904
जामनेर 2446
मुक्ताईनगर 581
पाचोरा 4091
पारोळा 4091
रावेर 959
यावल 2783