50 Hajar Protsahan Anudan : गेल्या महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यावेळी तत्कालीन सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याची घोषणा केली.
मात्र घोषणेची अंमलबजावणी गेल्या सरकारच्या काळात होऊ शकली नाही. मात्र वर्तमान शिंदे सरकारने 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. या प्रोत्साहनपर अनुदानासाठी राज्यातील 22 लाख 60 हजार नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी पात्र ठरले आहेत.
यापैकी आठ लाख 29 हजार शेतकरी बांधवांची पहिल्या यादीत नावे आलीत. त्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आणि आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. ज्यांनी केवायसी केली त्यांना अनुदानाचा लाभ देखील मिळाला. अशातच राज्यात ग्रामपंचायत इलेक्शनचा बिगुल वाजला आणि दुसऱ्या यादीस विलंब झाला.
मात्र आता गेल्या चार दिवसांपूर्वी इलेक्शनची रणधुमाळी शांत झाली असून प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी यादी देखील पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत जवळपास दहा लाख नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आता या शेतकरी बांधवांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यांना आधार प्रामाणिकरण लवकरात लवकर करण्याचा सल्ला दिला जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सांगली जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी एक लाख 60 हजार 795 नियमित पीक कर्जची परतफेड करणारे शेतकरी पात्र ठरले आहेत.
यापैकी पहिल्या यादीत 62,642 शेतकऱ्यांचा समावेश होता आणि या पहिल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण केलं त्यांना अनुदान देखील मिळाल आहे.
दरम्यान आता शनिवारी प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी जाहीर झाली असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील 25 हजार 102 शेतकऱ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील 23 हजार 63 शेतकरी हे जिल्हा बँकेचे आहेत. बाकीचे शेतकरी हे इतर बँकेतले आहेत. आता या शेतकऱ्यांना अनुदानासाठी केवायसी करावी लागणार आहे.
केवायसी झाल्यानंतर यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानासाठी 87,744 शेतकऱ्यांची नावे आली असून उर्वरित 73 हजार 51 शेतकऱ्यांची नावे पुढील यादीत जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले नाव चेक करण्यासाठी जवळील सीएससी सेंटर गाठावे आणि यादीत नाव आलं असेल तर आधार प्रामाणिकरणं देखील लवकर करून घ्यावे असा सल्ला दिला जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या पहिल्या यादीत 8.29 लाख शेतकऱ्यांचा समावेश होता आणि यांना 4,000 कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. दरम्यान आता दुसरी यादी जाहीर झाली असून यामध्ये 10 लाख शेतकऱ्यांचा समावेश असून यांना 5000 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.
तसेच प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी लवकरच समोर येणार असून यामध्ये 4.85 लाख शेतकऱ्यांचा समावेश राहणार असल्याचे सांगितले जात असून या शेतकऱ्यांना 1,200 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.