महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड केली जाते. तूर लागवड ही आंतरपीक म्हणून देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात असते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांमध्ये तुरीची लागवड होते.
दैनंदिन वापरामध्ये तुरीची डाळ किंवा तूर महत्त्वाचे असल्यामुळे साधारणपणे बाजारभाव देखील वर्षभर टिकून राहतात व त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचे पीक म्हणून ओळखले जाते.
तुर पिकाचे जर योग्य व्यवस्थापन ठेवले व दर्जेदार अशा उत्पादनक्षम वरायटींची निवड लागवडीसाठी केली तर नक्की शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळणे शक्य आहे.
परंतु याच तूर पिकाच्या बाबतीत जर बघितले तर पाऊस बऱ्याचदा उशिरापर्यंत सुरू राहतो व त्यामुळे रब्बी हंगामात देखील तुरीचे पीक चांगले वाढू शकते व जमिनीत ओलावा असल्याने जर तुरीचा खोडवा ठेवला तर मात्र तेव्हा देखील चांगला फुलोरा येऊन उत्तम असे उत्पादन मिळू शकते.
परंतु तुरीचा खोडव्यापासून जर चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर या करता काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या गोष्टींची जर काळजी घेतली तर तुरीच्या खोडव्यापासून देखील चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य आहे.
या गोष्टींची काळजी घ्या आणि तुरीच्या खोडव्यापासून भरघोस उत्पादन मिळवा
1- तुम्हाला जर तुरीची लागवड करायची आहे व त्याचा खोडवा देखील ठेवण्याचा प्लॅनिंग असेल तर तुरीच्या लागवडीकरिता व्हरायटीची निवड करताना प्रामुख्याने आयसीपीएल 87, आयसीपीएल 880, आयसीपीएल 39 व आयसीपीएल 151 या जातींची लागवड करावी.कारण या जातींचा खोडवा ठेवणे फायद्याचे ठरते.कारण या जाती कमी कालावधीच्या आहेत.
2- तसेच तुरीचा खोडवा ठेवताना तुमच्याकडे असलेली पाण्याची उपलब्धता लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे रब्बी हंगामात जर तुमच्याकडे तुरीला दोन ते तीन पाणी देता येईल एवढे पाणी उपलब्ध असेल तरच खोडवा ठेवावा.
3- तुरीचा खोडवा ठेवण्याकरिता अगोदरच्या तुरीच्या शेंगांची काढणी करताना ज्या शेंगा पक्व झालेल्या असतात त्या शेंगा तोडून गुच्छाच्या खाली दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवून झाडाची फांदी कापून टाकावी.
4- तसेच जमिनीची मशागत करताना हलकी वखरणी करावी व एकरी एक गोणी डीएपी खत देऊन पाणी द्यावे.
5- पहिल्या तुरीच्या पिकाच्या शेंगा तोडल्यानंतर खोडवा ठेवायचा असेल तर दिलेल्या पाणी नंतर दुसरे पाणी वीस दिवसांनी पुन्हा फुटवे येथील तेव्हा द्यावे व तिसरे पाणी त्यानंतर वीस दिवसांनी शेंगा भरताना द्यावे.
6- खोडवा ठेवलेल्या तुरीच्या पिकातील तीन ते चार आठवड्यामध्ये एक खुरपणी करून घ्यावी व नंतर एक ते दोन कोळपण्या नक्की कराव्यात.
7- तुर पिकाला जेव्हा फुलकळी लागेल व फुलोरा जोमात असेल तेव्हा दोन वेळा एक टक्का पोटॅशियम नायट्रेट किंवा दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी व अशा प्रकारचे फवारणी केल्यामुळे दाण्याचे वजन वाढायला मदत होते व कॉलिटी देखील चांगली मिळते.
8- तसेच खोडव्यावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव झाला तर नियंत्रणाकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फुलकळी जेव्हा येईल तेव्हा पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करून घ्यावी.
9- जेव्हा 50% पीक फुलोऱ्यावर राहील तेव्हा एचएनपीव्ही 500 एलई(हेलीओकील) दहा मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे.
10- जेव्हा शेंगा भरण्याची वेळ येईल तेव्हा या अवस्थेत बेंजोएट पाच टक्के एसजी तीन मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे.