Maharashtra Rain Alert : गेल्या महिन्यात महाराष्ट्रात वादळी पावसाने तडाखा दिला होता. गेल्या एप्रिल महिन्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याची देखील नोंद करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, या चालू मे महिन्यातही अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान आणि वादळी पाऊस पाहायला मिळतं आहे. अशातच, आता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार 11 मे पासून संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या वादळी पावसाची तीव्रता काहीशी अधिक राहणार असून या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आय एम डी ने आज पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ विभागातील पूर्वेकडील भागात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातही पावसाची शक्यता असून या सदर भागातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे उद्या अवकाळी पावसाची तीव्रता आणखी वाढणार आहे. कारण की उद्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार असा अंदाज आहे. उद्या विदर्भ विभागातील यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच उद्या पुणे, सातारा, लातूर, नांदेड जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. सोमवारी मात्र पावसाची तीव्रता थोडीशी कमी होणार आहे. तथापि, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सदर भागांना या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या ढगाळ हवामानामुळे आणि वादळी पावसामुळे राज्यातील तापमान मात्र कमी होऊ लागले आहे. काल विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40°c पेक्षा कमी नोंदवले गेले आहे.