Soybean Farming : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. याला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे. याची लागवड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन उत्पादनाचा विचार केला असता देशाच्या एकूण उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्रात 40% आणि मध्य प्रदेश मध्ये 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक.
मात्र गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे. एकरी उत्पादन कमी होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे पीक व्यवस्थापन. सोयाबीनचे उत्पादन कमी होत आहे, पण याचे लागवडी खालील क्षेत्र आजही विक्रमी आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला दुसरा पर्याय दिसत नसल्याने याची लागवड मोठ्या प्रमाणात केले जाते.
यंदाही सोयाबीनची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या शेतकरी बांधव सोयाबीन पीक व्यवस्थापनात व्यस्त आहेत. दरम्यान, आज आपण सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी फुलोरा अवस्थेत कोणत्या टॉनिकची फवारणी केली पाहिजे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्हीही सोयाबीनची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.
फुलोरा अवस्थेत या टॉनिकची फवारणी करा
सोयाबीन पिकातून जर तुम्हाला दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्ही मॅकेरीना या टॉनिकची फवारणी केली पाहिजे. याच्या फवारणीमुळे उत्पादनात भरीव वाढ होते. सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या टॉनिकची पहिली फवारणी फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि दुसरी फवारणी पहिली फवारणी झाल्यानंतर १२-१५ दिवसांनी करावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.
सोयाबीनसाठी मॅकरिनाचा डोस 250 मिली/एकर या प्रमाणात घेतला पाहिजे. टँक-मिक्स कॉम्बिनेशन म्हणून मॅकेरेना हे टॉनिक बहुतेक ऍग्रोकेमिकल्सशी पूर्णपणे सुसंगत आहे. हे कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांसह सर्व पिकांवर वापरले जाऊ शकते. म्हणजेच याची फवारणी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकांसह केली जाऊ शकते. यामुळे वनस्पतींचे आरोग्य, ताकत, टिलर्स, फुले आणि पीक उत्पादन देखील सुधारते. यामुळे सोयाबीन पिकाचे अजैविक ताणापासून संरक्षण होईल आणि पीक वाढण्यास आणि पूर्ण उत्पादन क्षमता प्राप्त करण्यास मदत होणार असा दावा केला जात आहे.