Soybean Farming : पिवळं सोनं अर्थातच सोयाबीनची लागवड राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. याला शेतकरी बांधव गेलो गोल्ड अर्थातच पिवळं सोनं म्हणून ओळखतात.
याचे कारण म्हणजे या पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन तर मिळतेच शिवाय बाजारात तेलबिया पीक असल्याने चांगला भावही मिळतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून बाजारभाव आणि उत्पादन खर्च याचे तारतम्य काही लागत नाहीये.
कारण की, गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला समाधानकारक असा भाव मिळत नाहीये. या चालू हंगामातही अनेक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात आपल्या मालाची विक्री करावी लागली आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले असून कैक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आलेला नाहीये.
तथापि, यावर्षी मानसून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने यंदा सोयाबीनची लागवड वाढू शकते असे म्हटले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आम्ही सोयाबीनच्या ग्रीन गोल्ड 3444 आणि केडीएस 726 अर्थातच फुले संगम या दोन जातींपैकी कोणत्या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळणार याविषयी माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कशी आहे सोयाबीनची ग्रीन गोल्ड 3445 व्हरायटी
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीनचा हा वाण 95 ते 100 दिवसात परिपक्व होतो. या जातीला चार बिया असणाऱ्या शेंगा मोठ्या प्रमाणात लागतात. अतिवृष्टी झाली तरीही हा वाण फायदेशीर ठरतो.
या जातीचे एकरी 30 किलो बियाणे वापरावे लागते. मध्यम ते भारी जमिनीत या जातीची लागवड केली जाऊ शकते. पाण्याची शाश्वत सुविधा उपलब्ध असल्यास अर्थातच बागायती भागात या जातीपासून 12 ते 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवले जाऊ शकते.
के डी एस 726 अर्थातच फुले संगम वाण कसा आहे
या जातीपासून 100 ते 105 दिवसात उत्पादन मिळते. या जातीपासून चांगले उत्पादन मिळते मात्र अलीकडे पान पातळ असल्याने येलो मोझॅक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
याशिवाय विविध किडींचा देखील या जातीवर प्रादुर्भाव आढळत आहे. मात्र ही जात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एक सुधारित जात असून अनेक शेतकरी याची लागवड करत आहेत आणि योग्य नियोजन केले तर यापासून चांगले उत्पादन देखील त्यांना मिळत आहे.
कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे
जर तुम्हाला टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करायची असेल तर फुले संगम अर्थातच केडीएस 726 या जातीची तुम्ही निवड करू शकता. मात्र जर तुम्ही पारंपारिक पेरणी करत असाल तर सोयाबीनचा ग्रीन गोल्ड 3445 हा वाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.