Wheat Farming : महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात गहू या अन्नधान्य पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. शासकीय आकडेवारीनुसार जर पाहिलं तर राज्यात जवळपास 11 ते 12 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी होते. मात्र हे क्षेत्र पावसाच्या उपलब्धतेवर आधारित असते. अर्थात जर पाऊसमान कमी राहिले तर गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते.
यावर्षी देखील मान्सून काळात चांगला पाऊस बरसला नसल्याने गहू लागवडीखालील क्षेत्र कमी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र असे असले तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता आहे असे शेतकरी बांधव आणि ज्या भागात समाधानकारक असा पाऊस झाला आहे तेथील शेतकरी गव्हाची पेरणी करणार आहेत.
मात्र गहूची लागवड यंदा थोड्या प्रमाणात का होईना घटणार आहे. दरम्यान, यावर्षी गहू पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सुधारित वाणाची पेरणी करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण गव्हाच्या काही सुधारित वाणाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कृषी तज्ञांच्या मते यंदा पाऊसमान कमी आहे यामुळे शेतकऱ्यांनी कमी पावसात तयार होणाऱ्या गव्हाच्या वाणाची निवड केली पाहिजे. मर्यादित सिंचन परिस्थितीमध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या वाणाची शेतकऱ्यांनी निवड करावी असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. यामुळे आता आपण जिरायती/कोरडवाहू भागासाठी आणि मर्यादित सिंचन परिस्थितीमध्ये चांगल्या उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या काही प्रमुख जाती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
गव्हाच्या सुधारित जाती
एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती) : यंदा कमी पाऊसमान असल्याने गव्हाची ही जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. जिरायती कोरडवाहू भागासाठी आणि मर्यादित सिंचन परिस्थितीत गव्हाचा हा सरबती वाण फायदेशीर ठरणार आहे. या जातीचा पीक परीपक्व कालावधी १०५ ते १०८ दिवसाचा आहे. या जातीपासून १६ ते १८ क्विंटल प्रति हेक्टर एवढे सरासरी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. यंदाच्या कमी पावसाच्या परिस्थितीत गव्हाची ही जात लागवडीसाठी उपयुक्त ठरेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
एन.आय.ए.डब्लू. १९९४ (फुले समाधान) : बागायती भागात आणि मर्यादित सिंचन परिस्थितीत हा वाण फायदेशीर ठरेल. राहुरी विद्यापीठाने विकसित केलेला गव्हाचा हा एक सुधारित वाण आहे. एक पाणी भरण्यासाठी पाण्याची उपलब्धता असेल तर या जातीची लागवड करणे फायदेशीर ठरेल. सरासरी 110 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते आणि हेक्टरी 35 ते 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळू शकते. कोरडवाहू भागात हा वाण येणार नाही. परंतु एक पाणी भरण्यासाठी जर शाश्वतं पाणी असेल तर या वाणाची पेरणी केली पाहिजे.
फुले अनुपम (एन.आय.ए.डब्लू. ३६२४) : हा देखील बागायती भागात येणारा आणि मर्यादित सिंचन परिस्थितीत तयार होणारा राहुरी विद्यापीठाने विकसित केलेला एक महत्त्वाचा वाण आहे. सरासरी 110 दिवसात पीक काढण्यासाठी तयार होऊ शकते. हेक्टरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते. किमान एक पाणी मात्र या पिकासाठी द्यावे लागेल. या जातीचे पीक तांबेरा रोगास प्रतिकारक राहते. या जातीपासून चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये हा वाण लोकप्रिय ठरला आहे. राज्यातील हवामान मानवते यामुळे या जातीची लागवड यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.