Wheat Farming : यंदाच्या खरीप हंगामावर आतापर्यंत दुष्काळाचे सावट होते. मात्र या चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा एकदा खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळाले आहे.विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे रब्बी हंगामासाठी देखील आता पाण्याची उपलब्धता राहणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधव आता येत्या काही दिवसात रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीला लागणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध पिकांची शेती केली जाते. यामध्ये गव्हाची लागवड सर्वाधिक आहे.
गव्हाची पेरणी साधारणतः एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत केली जाते. तसेच 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत गव्हाची उशिरा पेरणी होती. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात गहू या मुख्य पिकाची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड होते.
याहीवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड करणार असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
फुले समाधान : गव्हाचा हा एक सुधारित वाण आहे. या जातीची वेळेवर तसेच उशीरा पेरणी करण्यासाठी शिफारस केली जाते. एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गव्हाची वेळेवर पेरणी केली जाते. तसेच 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत उशिरा गव्हाची पेरणी केली जाते. ही जात या दोन्ही परिस्थितीमध्ये योग्य आहे. पण ही जात बागायती भागात लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे. या जातीपासूनच साधारणतः 44 ते 46 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
फुले सात्विक : गव्हाचा हा देखील एक सुधारित वाण आहे. या वाणाची राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होते. मात्र या जातीचे उत्पादन फुले समाधान या जातीपेक्षा कमी आहे. या जातीपासून साधारणता 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
एनआयडीडब्ल्यू -११४ : गव्हाची ही जात साधारणता 110 ते 115 दिवसात परिपक्व होते. या जातीची एक विशेषता म्हणजे ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा केला जातो. गव्हाच्या या सुधारित जातीपासून साधारणता 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत चे उत्पादन मिळते. अर्थातच उत्पादनाच्या बाबतीत हा वाण फुले सात्विक प्रमाणेच आहे.