Wheat Farming : सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात अपेक्षित असा पाऊस झाला नाही परिणामी रब्बी हंगामात अनेक ठिकाणी पेरणी होऊ शकली नाही. तथापि जिथे पावसाळी काळात चांगला पाऊस झाला होता आणि ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी रब्बी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे.
गहू आणि हरभरा या पिकांची रब्बी हंगामात पेरणी केली जाते. सध्या हरभरा या रब्बी पिकाची हार्वेस्टिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी हरभरा विक्रीसाठी देखील बाजारात येऊ लागला आहे. दरम्यान येत्या एक ते दीड महिन्यात रब्बी हंगामातील गहू या मुख्य पिकाची हार्वेस्टिंग सुरू होणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण भारतात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते, गहू उत्पादनात कोणत्या राज्याचा भारतात पहिला क्रमांक लागतो याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गहू उत्पादनात भारताचा कितवा नंबर
आपल्या भारतात तांदूळ, कापूस, कांदा आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गव्हाच्या उत्पादनाचा विचार केला तर आपला भारत देश जगात चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
म्हणजे जागतिक गहू उत्पादनात भारताचा चौथा क्रमांक लागतो. रशिया या देशात गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. गहू उत्पादनाच्या बाबतीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच अमेरिका गहू उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
विशेष म्हणजे आपले शेजारील राष्ट्र चीन गहू उत्पादनाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. म्हणजेच रशिया, अमेरिका आणि चीन ही अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर येतात.
भारतात सर्वात जास्त गव्हाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते
गहू उत्पादनाच्या बाबतीत देशात उत्तर प्रदेश या राज्याचा डंका आहे. येथे गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या एकूण गहू उत्पादनापैकी 32.42% एवढे उत्पादन एकट्या उत्तर प्रदेश राज्यात घेतले जाते.
गंगा आणि जमुना नद्यांमुळे उत्तर प्रदेश राज्याला चांगला सुपीक भाग लाभला आहे. शिवाय या नद्यांमुळे उत्तर प्रदेश राज्यात चांगला बागायती भाग पाहायला मिळतो. येथील हवामान आणि माती देखील गहू पिकासाठी उत्कृष्ट आहे.
त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन होते. दुसरीकडे मध्य प्रदेश या राज्याचा गहू उत्पादनाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. येथे देशाच्या एकूण उत्पादनापैकी 11 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात गव्हाचे फक्त दोन टक्के एवढे उत्पादन होते. अर्थातच गहू उत्पादनाच्या बाबतीत आपले महाराष्ट्र खूपच पिछाडीवर आहे.