Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम प्रगतीपथावर आहे. गहू आणि हरभरा पिकाची पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधव लगभग करत आहेत. काही ठिकाणी गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी झाली आहे. पण ज्या भागात अजून गव्हाची पेरणी बाकी आहे त्यांना 15 डिसेंबर पर्यंत गव्हाची पेरणी करता येणार आहे.
खरंतर गव्हाची वेळेवर पेरणी एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान केली जाते. तसेच गव्हाची उशिराने पेरणी पंधरा नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत केली जाते.
अशा परिस्थितीत आज आपण उशिरा गहू पेरणीसाठी उपयुक्त अशा काही सुधारित गव्हाच्या जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. पण शेतकरी बांधवांना 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
यामुळे जर तुम्ही गव्हाची उशिरा पेरणी करणार असाल तर १५ डिसेंबर पूर्वी तुम्हाला पेरणी करावी लागणार आहे. 15 डिसेंबर नंतर पेरणी केली तर पिक उत्पादनात घट येऊ शकते अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
HD 2989 : गव्हाचा हा एक सुधारित वाण आहे. उशिरा पेरणीसाठी हा वाण उपयुक्त आहे. राज्यात या जातीची बऱ्यापैकी पेरणी केली जाते. या जातीचे पीक सरासरी 115 ते 120 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून हेक्टरी 40 ते 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
कैलास पी बी एन 142 : ज्या शेतकऱ्यांना गव्हाची वेळेवर पेरणी करता आलेली नसेल त्या शेतकरी बांधवांसाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे. हा वाण उशिरा पेरणीसाठी उपयुक्त ठरतो.
उशिरा पेरणी करण्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. पीक पेरणीनंतर सरासरी 115 ते 120 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. या जातीपासून 32 ते 35 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू-३४) : गव्हाचा हा सुधारित वाण अल्पकालावधीत परिपक्व होतो. या जातीचे पीक सरासरी 105 ते 110 दिवसात काढणीसाठी तयार होत असल्याचा दावा काही तज्ञ लोकांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
गव्हाचा हा वाण बागायती भागात उशिरा पेरणी करण्यासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या जातीपासून 35 ते 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.