Wheat Farming : यंदाच्या रब्बी हंगामात जर तुम्हीही गव्हाची पेरणी केलेली असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरं तर यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला आहे.
अनेक ठिकाणी तर पावसाळ्यात पाऊसच झाला नाही. यामुळे अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे संकट तयार झाले आहे. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घटले आहे.
विशेष म्हणजे मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगाम देखील प्रभावित होणार आहे. काही भागात तर गव्हाची पेरणी सुद्धा झालेली नाही.
पण, ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाणी शिल्लक होते त्यांनी गव्हाची पेरणी केलेली आहे. मात्र पाणी कमी असल्यामुळे आता पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागणार आहे.
अशा परिस्थितीत आता गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून गव्हाच्या पिकाला कमी पाणी उपलब्ध असल्याने केव्हा-केव्हा पाणी दिले पाहिजे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आज आपण गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृषी तज्ञांनी गव्हाच्या पिकाला केव्हा पाणी दिले पाहिजे? याबाबत दिलेली माहिती थोडक्यात समजून घेणार आहोत.
गव्हाच्या पिकाला केव्हा पाणी दिले पाहिजे?
जर तुमच्याकडे सिंचनासाठी फक्त चार पाणी देण्याइतके पाणी असेल, तर तुम्ही पहिले पाणी – बियाणे पेरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी, दुसरे पाणी – पहिले पाणी दिल्यानंतर 30 दिवसांनी, तिसरे पाणी – दुसरे पाणी दिल्यानंतर तीस दिवसांनी, चौथे पाणी – तिसरे पाणी दिल्यानंतर 20-25 दिवसांनी द्यावे.
जर पिकाला देण्यासाठी फक्त एकच पाणी उपलब्ध असेल तर अशावेळी लक्षात ठेवा की, पेरणी केल्यानंतर 20-25 दिवसांच्या आत जेव्हा वरच्या मुळांचा उदय होण्याची अवस्था असते तेव्हा पाणी देणे आवश्यक आहे.
जर दोन पाणी देण्याइतके पाणी असेल तर वरच्या मुळांचा उदय होण्याच्या अवस्थेत पहिले पाणी दिले पाहिजे आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत दुसरे पाणी दिले पाहिजे असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सोबतच कृषी तज्ञांनी ज्या शेतकऱ्यांकडे गव्हाच्या पिकासाठी तीन पाणी असतील त्यांनी पहिले पाणी वरच्या मुळांचा उदय होण्याच्या अवस्थेत, फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि चीक भरण्याच्या वेळी पाणी दिले पाहिजे असा सल्ला दिला आहे.