Wheat Farming : तुम्हीही रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली आहे का, मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. विशेषता ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उशिराने गव्हाची पेरणी केली असेल अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. खरे तर गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे.
या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. गव्हाची पेरणी प्रामुख्याने नोव्हेंबर महिन्यात केली जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांना वेळेवर गव्हाची पेरणी करता येत नाही ते शेतकरी बांधव उशिराने गहू पेरणी करत असतात.
गव्हाची उशिराने पेरणी 15 डिसेंबर पर्यंत केली जाऊ शकते. काही शेतकरी बांधव 15 डिसेंबर नंतरही गव्हाची पेरणी करतात. मात्र कृषी तज्ञांनी यानंतर गहू पेरणी करू नये असा सल्ला दिला आहे.
कृषी तज्ञांच्या मते यानंतर जर गव्हाची पेरणी केली गेली तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती असते. यामुळे उशिरा पेरणी करायची असेल तर डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच पेरणी पूर्ण करणे आवश्यक असते.
दरम्यान गहू पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने एक अतिशय महत्त्वाचा आणि कामाचा सल्ला जारी केला आहे. यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून गव्हाचे पीक 40 ते 45 दिवसाच्या झाल्यानंतर कोणत्या खताचा वापर करणे टाळले पाहिजे याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कृषी विभागाचा सल्ला
कृषी मंत्रालयाने गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सूचना जारी केली आहे. मंत्रालयाने आपल्या सल्लागारात म्हटले आहे की, गव्हाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमी त्यांच्या शेतात जावे.
शेतात तण दिसल्यास ते उपटून फेकून द्यावे. तसेच, मंत्रालयाने म्हटले आहे की, गव्हाच्या पेरणीनंतर 40-45 दिवसांनी शेतात नायट्रोजन खतांचा वापर थांबवावा.
तसेच गव्हाला पाणी देण्यापूर्वी जमिनीत युरिया टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गव्हाची उशिरा पेरणी केल्यास शेतात अरुंद व रुंद पानांचे तण वाढतात.
अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची उशिरा पेरणी केली आहे, त्यांना तणनाशकाचा वापर करावा लागणार आहे, त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होणार आहे.
शेतकरी त्यांच्या शेतात तणनाशक सल्फोसल्फुरॉन 75WG सुमारे 13.5 ग्रॅम प्रति एकर किंवा सल्फोसल्फुरॉन अधिक मेटासल्फुरॉन 16 ग्रॅम प्रति एकर 120-150 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतात. पहिल्या पाण्याच्या आधी किंवा 10-15 दिवसांनी पाणी दिल्यानंतर फवारणी करावी, असे देखील विभागाने स्पष्ट केले आहे.