Wheat Farming : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरुये. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये रब्बी पिकांच्या पेरणींना वेग आला आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण गव्हाच्या प्रमुख सरबती वाणाची माहिती पाहणार आहोत.
गव्हाचे प्रमुख सरबती वाण आणि त्यांच्या विशेषता
एम. ए. सी. एस. ६२२२ : गव्हाचा हा प्रमुख सरबती वाण आहे. याची लागवड देशातील अनेक प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये होते हे विशेष. आपल्या राज्यातही याची कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते.
या जातीबाबत बोलायचं झालं तर हा प्रमुख वाण १०५ ते ११० दिवसात परिपक्व होत असतो. या जातीपासून हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. गव्हाचा हा प्रमुख वाण बागायती भागात वेळेवर पेरणीसाठी म्हणजेच एक ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४) : या जातींचे पीक १०८ ते ११२ दिवसात परिपक्व होते. उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर या गव्हाच्या प्रमुख जातीपासून ४५ ते ५० क्विंटल एवढे उत्पादन मिळते. हा गव्हाचा प्रमुख सरबती वाण आहे.
याची सुद्धा लागवड बागायती भागात केली जाते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी हा वाण उपयुक्त आहे. या जातींचे पीकही तांबेरा रोगास प्रतिकारक आहे.
एम.ए.सी.एस.६४७८ : गव्हाची ही सुद्धा एक प्रमुख जात आहे. या जातिबाबत बोलायचं झालं तर याचे पीक १०८ ते ११० दिवसात परिपक्व होते. या जातीपासून शेतकऱ्यांना कमाल ५०ते ५५ क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. ही जात बागायती भागात वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत आहे. तांबेरा रोगास प्रतिकारक अन अधिक उत्पादन क्षमता हे या जातीचे वैशिष्ट्य आहे.
पीडीकेव्ही- सरदार (एकेडब्ल्यू- ४२१०६) : या जातीचे पीक १०० दिवसांत परिपक्व होते. गव्हाच्या या सुधारित जातीपासून शेतकऱ्यांना ४२ ते ४५ क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. या जातींचे पीक बागायती भागात वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे.