Wheat Farming : शेतकरी मित्रांनो जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात गहू पेरणी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. खरंतर, रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पिकांची पेरणी केली जाते.
गहू लागवडी बाबत बोलायचं झालं तर हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक. या पिकाची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड होते. याची लागवड ही नोव्हेंबर महिन्यात करण्याचा सल्ला दिला जातो.
एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा काळ गहू पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा कृषी तज्ञ करतात. दरम्यान कृषी तज्ञांनी गहू पेरणी दहा ते पंधरा डिसेंबर नंतर करू नये असा सल्ला दिला आहे.
गहू पेरणीला जेवढा उशीर होईल तेवढी उत्पादनात घट होत असते यामुळे गहू पेरणी ही नेहमीच वेळेवर करावी. दरम्यान आता आपण गव्हाच्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत.
गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
1) अंकुर केदार : गव्हाची ही एक सुधारित जात आहे. या जातीची देशातील अनेक भागांमध्ये लागवड पाहायला मिळते. नोव्हेंबर मध्ये याची पेरणी केल्यासं शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. एकरी 18 ते 20 किलो बियाण्याचा वापर करून अंकुर केदार या जातीची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना एकरी 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
2) यशोदा सीड्स कंपनीचे एक्सपर्ट 7777 : गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीचा गहू पेरणी करण्यासाठी एकरी बियाण्याचे प्रमाण 18 ते 20 किलो असायला हवे. या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
3) सिद्धांत सीड्स कंपनीचे लोकवन : हा देखील वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या जातीपासूनही शेतकऱ्यांना एकरी 20 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे.
4)Mahyco सीड्स कंपनीचे प्रथम 7070 : गव्हाची ही आणखी एक लोकप्रिय जात. या जातीची महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये लागवड होते.
5)Mahyco सीड्स कंपनीचे मुकुट प्लस : तुम्हीही नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करणार असाल तर या जातीची निवड करू शकता. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते शिवाय या जातीच्या गव्हापासून चांगल्या चपात्याही तयार होतात. यामुळे बाजारात या जातीच्या गव्हाला नेहमीच मागणी असते.