Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. कापूस लागवडीच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो.
खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तथा मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाची लागवड केली जात आहे. यंदा तर पावसाळा चांगला राहणारा असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने कापूस लागवड आणखी वाढणार असा विश्वास तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागला आहे.
अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून बीटी कापसाचे वाण निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता.
यामुळे जर तुम्हीही यंदाच्या हंगामात बीटी कापसाची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
बीटी कापूस वाण निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ?
2024 च्या खरीप हंगामात जर तुम्ही बीटी कापूस लागवड करण्याच्या तयारीत असाल तर बीटी कापसाचे वाण निवडताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे. जसे की तुम्ही निवडत असलेले बीटी कापूस वाण जर कोरडवाहू भागात लागवड करायची असेल तर पाण्याचा ताण सहन करणारे असावे.
जर तुम्हाला कापसाची सघन लागवड करायची असेल म्हणजे दाट लागवड करायची असेल तर बीटी कापूस वाण हे कमी उंचीचे आणि कमी फांद्या असणारे असावे. म्हणजेच कापसाची दाटी होणार नाही आणि पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
तुमच्या भागात ज्या जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळालेले असेल त्याच वाणाची निवड करा. कारण की कापूस पीक उत्पादनात स्थानिक हवामान देखील महत्वाची भूमिका निभावत असते. यामुळे तुमच्या स्थानिक हवामानात ज्या जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळत असेल त्या वाणाची निवड करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
कोरडवाहू भागात लागवड करायची असेल तर बीटी कापसाचे असे वाण निवडावे जे लवकर काढणीसाठी म्हणजे 140 ते 150 दिवसांत हार्वेस्टिंग साठी तयार होईल. तसेच कोरडवाहू भागात मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या बीटी कापूस वाणाची देखील लागवड होऊ शकते.
बागायती भागात मात्र 160 ते 180 दिवसात काढण्यासाठी तयार होणाऱ्या बीटी कापूस वाणाची निवड करावी. कोरडवाहू भागात अशा जातीची निवड करा ज्याचा बोंडाचा आकार हा तीन ते चार ग्रॅम राहील. तसेच बागायती भागात बोंडाचा आकार 4g पेक्षा जास्त असेल तेच वाण निवडा.