Mumbai Railway : राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. राज्यासह दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठी रेल्वेने प्रवास केला जातो. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर नेहमीच रेल्वेला पसंती मिळते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच गतिमान आणि सुरक्षित आहे. तसेच रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा सुद्धा आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी राहते.
रेल्वे देखील वेगवेगळ्या मार्गांवर नवनवीन गाड्या सुरू करत असते. अशातच आता राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राजधानी मुंबईहून एक साप्ताहिक ट्रेन सुरू केली जाणार आहे. खरंतर देशाच्या आर्थिक राजधानी रोजगाराच्या शोधात देशातील कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. राज्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईमध्ये रोजगार शोधायला येतात. याशिवाय उत्तर प्रदेश मधून मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक पाहायला मिळते.
दरम्यान मुंबईमध्ये रोजगारासाठी स्थायिक झालेल्या याच उत्तर प्रदेश मधील लोकांच्या सोयीसाठी रेल्वेने एक साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उत्तर प्रदेश मधील मऊ दरम्यान एक साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार आहे. रेल्वे विभाग गाडी क्रमांक 15181 ही ट्रेन अप मार्गांवर आणि गाडी क्रमांक 15182 ही डाऊन मार्गावर सूरू करणार आहे. नवीन ट्रेन मऊ स्थानकापासून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलपर्यंत सुरू केली जाणार आहे.
ही गाडी १६ डिसेंबर रोजी मऊ येथून सुटणार आहे. तसेच 18 डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल येथून ही गाडी मऊकडे रवाना होईल, अशी माहिती रेल्वे विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, ही ट्रेन मऊ ते खोरहाट स्टेशन मार्गे आझमगड, खोरासन रोड मार्गे जौनपूरला जाईल. त्यानंतर ती प्रयागराजमार्गे मुंबईला रवाना होणार आहे.
या साप्ताहिक ट्रेनमध्ये अत्याधुनिक एलएचबी कोच बसवण्यात आले आहेत. यामध्ये लगेज कम जनरेटर वाहनाचे दोन डबे, जनरल सेकंड क्लासचे चार, स्लीपर क्लासचे पाच, वातानुकूलित थर्ड इकॉनॉमी क्लासचे 10, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे एक आणि एलएसएलआरडीसह 22 डबे बसविण्यात आले आहेत. निश्चितच या गाडीमुळे मुंबई ते उत्तर प्रदेश चा प्रवास अधिक गतिमान होईल अशी आशा असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.