Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढत आहे. खरं पाहता यावर्षी थंडीला उशिराने सुरुवात झाली आहे. मध्यंतरी, महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते यामुळे गारठा कमी झाला होता. मात्र आता गेले काही दिवसांपासून थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
अशातच, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळत आहे.राज्यातील विदर्भ प्रांतात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान कायम आहे. अशातच काल रात्री बुलढाणा, भंडारा आणि गोंदिया या तिन्ही जिल्ह्यात काल विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव या तालुक्यात विजांचा कडकडाटासह पावसाच्या जोरदार सऱ्या बरसल्या यामुळे बळीराजाची धाकधूक वाढली आहे.
या ढगाळ हवानामुळे आणि अवकाळी पावसामुळे वावरात उभे असलेल्या तूर आणि पालेभाज्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामासाठी थंडी पोषक असते मात्र ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस घातक ठरतो.
विशेषता गहू आणि हरभरा जे की रब्बी हंगामातील मुख्य पिके आहेत याला या वातावरणाचा मोठा फटका बसू शकतो. दरम्यान महाराष्ट्रात आज आणि उद्या पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे. विभागाच्या मते दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाडा या विभागात पावसाची शक्यता आहे.
दरम्यान राजधानी मुंबई सह कोकणात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये माथेरान पेक्षा अधिक गारठा असल्याचे चित्र आहे. एकीकडे माथेरानचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस आहे तर मुंबईचे 15 अंश पेक्षा खाली गेले आहे. फक्त मुंबईच नाही तर राज्यातील बहुतांशी ठिकाणी अशीच परिस्थिती कायम आहे.
कोकण, खानदेश, अहमदनगर, नासिक, पुणे, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात किमान तापमान खाली गेले आहे. यामुळे या ठिकाणी गारठा जाणवणार असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात देखील येत्या काही दिवसात किमान तापमान कमी होईल आणि थंडीत वाढ होईल अशी शक्यता आहे.