Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. आता राज्यासह संपूर्ण देशात हळूहळू गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे.
देशातील विविध भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात घट होत आहे.यामुळे रात्री आणि सकाळी आल्हाददायक थंडीचा अनुभव येत आहे. पण अजूनही म्हणावी तशी थंडी पडलेली नाही.
यामुळे थंडीचा जोर केव्हा वाढणार हा सवाल कायम आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने देशातील एकंदरीत हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच राज्यातील हवामानाबाबत देखील माहिती दिली आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडणार की नाही याबाबतही भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे.
कुठं बरसणार पाऊस ?
इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस देशातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये 23 नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये 23 नोव्हेंबर पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे.
तसेच आज 21 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात पाऊस पडणार असा अंदाज आहे. 22 आणि 23 नोव्हेंबरला कर्नाटक, केरळ आणि माहेमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असे IMD ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच काही ठिकाणी दाट धुके पाहायला मिळणार आहेत.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यात दाट धुके पडतील असा अंदाज आय एम डी ने यावेळी वर्तवला आहे.
दरम्यान या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. आता राज्यातील किमान तापमानात घट होईल आणि थंडीची तीव्रता हळूहळू वाढत जाईल असे मत व्यक्त केलं जात आहे.