Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढत चालली आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की, या चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली होती.
विशेष म्हणजे विदर्भ विभागातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा तसेच फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. कारण की, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग
भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे.
आयएमडीने सांगितल्याप्रमाणे आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र दिल्ली हरियाणा पंजाब तसेच उत्तर भारतातील बहुतांशी राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज 24 फेब्रुवारीपासून ते 29 फेब्रुवारी पर्यंत च्या कालावधीत महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होणार असा देखील अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
येत्या २४ तासांत अरुणाचल प्रदेश राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होईल असा अंदाज देण्यात आला आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम येथे सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्रातही उद्यापासून अवकाळी पावसाला पोषक परिस्थिती तयार होणारच अंदाज आहे.
उद्यापासून राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.
राज्यातील विदर्भ विभागातील सर्व 11 जिल्हे आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र अवकाळी पाऊस, गारपीट होणार नाहीये. उर्वरित महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.