Viral News : आपल्या आजूबाजूला असे अनेक प्रकार घडतात ज्यांच्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. हे असे प्रकार निसर्गाला देखील आव्हान देतात. दरम्यान बिहार राज्यात देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारमध्ये एक गाय गर्भधारणेविना म्हणजे गरोदर न राहता तब्बल 12 वर्षांपासून नियमितपणे दूध देत आहे.
कदाचित हे वाचून तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र ही एक सत्य घटना आहे. यामुळे सध्या बिहारमधील या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरंतर, गरोदर न राहता कोणतीच गाय दूध देऊ शकत नाही मात्र बिहार मधील सीवान येथील एका पशुपालक शेतकऱ्याची एक गाय गरोदर न राहता बारा वर्षांपासून नियमितपणे दिवसातून दोन वेळा दूध देत आहे.
यामुळे या घटनेला दैवी चमत्कार म्हणून पाहिले जात आहे. अनेकांनी हे विज्ञानापलीकडे आहे, हा देवाचा चमत्कार आहे असे म्हणत या गाईला देवाची उपमा दिली आहे. आपल्यापैकी अनेकांनी सतयुगात तसेच त्रेतायुगात कामधेनु गाय असल्याचे ऐकले असेल. मात्र तुम्ही कामधेनू गाय प्रत्यक्षात पाहिलेली नसेल. परंतु बिहार मधील सिवान जिल्ह्यातील चिताखाल येथे कामधेनु गाईसारखीच एक गाय आढळली आहे.
चिताखाल येथील पशुपालक शेतकरी संतोष शर्मा यांच्याकडे ही गाय आहे. संतोष यांनी असा दावा केला आहे की ही गाय गेल्या बारा वर्षांपासून गरोदर न राहता नियमितपणे दिवसाला दोनदा दूध देत आहे. संतोष यांनी या गाईला नंदनी असं नाव दिल आहे. ही नंदनी गाय जर्सी जातीची असून ती गर्भधारणेविना सध्या सहा ते सात लिटर दूध देत आहे.
त्यांनी या गाईबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ही गाय जर्सी जातीची असून तीचे वय पंधरा वर्षे आहे. आणि ही गाय गेल्या बारा वर्षांपासून गर्भधारणेविना नियमितपणे दूध देत आहे. सुरुवातीला एकदा ही गाय गरोदर राहिली होती. मात्र तदनंतर ही गाय एकदाही गरोदर राहिली नाही. नंदीनी गाईला 30 पेक्षा जास्त वेळा गर्भधारणेसाठी प्रयत्न केले गेलेत.
मात्र ही गाय गरोदर राहतच नाही. सुरुवातीला जेव्हा ही गाय गरोदर राहिली होती तेव्हा ही गाय 18 ते 20 लिटर पर्यंत दूध द्यायची. मात्र सध्या गरोदर न राहता ही गाय सहा ते सात लिटर पर्यंत दूध देत आहे. या गाईचे सध्या सकाळ आणि संध्याकाळ असे दोन्ही वेळा दूध काढले जात आहे.
दरम्यान या गाईची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा पाहायला मिळत आहे. अनेकजण ही गाय पाहण्यासाठी संतोष यांच्या घरी देखील जातात. पण ही गाय गरोदर न राहता कस काय दूध देत आहे या प्रश्नाचे उत्तर पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांकडे देखील नाहीये.