Vihir Anudan Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून तथा केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. राज्य शासनाच्या आणि केंद्रीय योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून त्यांचे आर्थिक हित जोपासले जात आहे.
शेतकऱ्यांना शेती करताना शाश्वत पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी विहिरीकरिता देखील अनुदान दिले जात आहे. कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळावे त्यांच्या जमिनी बागायती व्हाव्यात यासाठी शासनाकडून विहीर खोदण्यासाठी अनुदान पुरवले जात आहे.
यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुदान पुरवले जाणार आहे.
यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अर्थातच एस सी प्रवर्गातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते.
दुसरीकडे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमाती अर्थातच शेड्युल ट्राईब प्रवर्गातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
या दोन्ही योजनेअंतर्गत या सदर प्रवर्गातील शेतकऱ्यांना विहिरीसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ दीड लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना आणि किमान एक एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिला जातोय.
या योजनेमुळे या वंचित घटकातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान याच दोन्ही योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात 1 हजार 93 विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी दाखल झालेल्या अर्जापैकी 798 प्रस्तावाला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मंजुरी दिलेली आहे. तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सादर झालेल्या अर्जापैकी 295 प्रस्तावांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मान्यता दिलेली आहे.
म्हणजे या दोन्ही योजनेअंतर्गत एकूण 1 हजार 93 विहिरीचे प्रस्ताव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मंजूर केलेले आहेत. या दोन्ही योजनेसाठी जिल्ह्यातून दोन हजार ५६० शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते.
दरम्यान या दाखल झालेल्या अर्जापैकी आता एक हजाराहून अधिक अर्जावर कारवाई करत त्यांचे मंजूर झाले आहेत. म्हणजे आता या मंजूर झालेल्या विहिरीसाठी लवकरच खोदकाम सुरू होण्याची शक्यता आहे.