Vande Bharat Train : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर होणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर येथे आयोजित एका सभेत कोल्हापूरला नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार अशी घोषणा केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ही ट्रेन राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान सुरू होऊ शकते. दुसरीकडे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देशाला आणखी एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. सध्या देशात या प्रकाराच्या 51 गाड्या सुरू आहेत. यातील आठ गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावत आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी नवीन गाड्या मिळण्याची शक्यता आहे.
ही ट्रेन देशातील विविध राज्यांमध्ये चालवली जात आहे. अशी अनेक राज्ये आहेत जिथे दोन ते तीन वंदे भारत सुरु झाल्या आहेत. आता ईशान्येकडील राज्यांनाही वंदे भारतच्या सेवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशाच्या ईशान्येकडील राज्यांपैकी एक असलेल्या त्रिपुराला देखील आता ही ट्रेन मिळणार आहे. जर सर्व काही ठीक राहिले तर जून किंवा जुलैमध्ये त्रिपुरा राज्याला पहिल्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असा दावा केला जात आहे.
धर्मनगर ते अगरतला या मार्गावर ही गाडी सुरू होऊ शकते. सध्या या मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर वंदे भारत ट्रेन सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राला मिळणार इतक्या वंदे भारत
आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
नजीकच्या भविष्यात मात्र मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा या मार्गांवर ही ट्रेन धावण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबई ते कोल्हापूर यादरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावू शकते असे संकेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिले आहेत.