Vande Bharat Train : महाराष्ट्राला नुकतीच आठव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती.
तेव्हापासून आतापर्यंत देशातील ५१ महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. यातील दहा गाड्या नुकत्याच रुळावर आल्या आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद यादरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.
खरे तर महाराष्ट्रातून आधी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या सात मार्गांवर ही गाडी धावत होती.
आता मुंबई सेंट्रल अहमदाबाद या नवीन मार्गावर ही ट्रेन सुरू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आठ वर पोहचली आहे.
दरम्यान आता आपण या नव्याने सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तसेच या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार आहे हे देखील आता आपण पाहणार आहोत.
500 किलोमीटरचे अंतर फक्त सहा तासात
ही नव्याने सुरू झालेली गाडी 500 किलोमीटरचे अंतर फक्त सहा तासात पूर्ण करणार आहे. याआधीपासून या मार्गावर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर ही गाडी सुरू आहे.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर ही गाडी अहमदाबादमार्गे धावते. म्हणजेच या मार्गावर सुरू झालेली मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद ही दुसरी गाडी आहे. दरम्यान आता आपण या नवीन गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक
ही नवीन गाडी रविवार वगळता आठवड्यातील सहा दिवस सुरू राहणार आहे. ही गाडी अहमदाबादहून सकाळी 6.10 वाजता सुटून मुंबई सेंट्रलला 11.35 वाजता पोहोचते. तसेच मुंबई सेंट्रलवरून दुपारी ३.५५ वाजता निघून रात्री ९.२५ वाजता अहमदाबादला पोहोचते.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
ही गाडी बडोदा, सुरत, वापी आणि बोरिवली या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.