Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरे तर ही ट्रेन जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून चर्चेतचं आहे. कधी ही गाडी आपल्या आरामदायी प्रवासासाठी, वर्ल्ड क्लास सोयी सुविधासाठी चर्चेत असते तर कधी ही गाडी आपल्या महागड्या तिकीट दरासाठी चर्चेत असते. अलीकडे या गाडीच्या काही निगेटिव्ह चर्चाही पाहायला मिळाल्यात.
त्या निगेटिव्ह चर्चा म्हणजे या गाडीमध्ये दिले जाणारे अन्न हे निकृष्ट दर्जाचे असते असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. तथापि, वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करण्यात बहुतांशी प्रवाशांनी पसंती दाखवली आहे. ही गाडी सध्या देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. यातील 8 मार्ग हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष बाब अशी की, येत्या काही दिवसात महाराष्ट्राला आणखी काही नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे सांगितले आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर आगामी काळात वंदे भारत ट्रेन धावणार आहे. याशिवाय या ट्रेन संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशाला लवकरच 52 वी वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याचे संकेत आहेत.
ही वंदे भारत ट्रेन रांची ते गोरखपूर या मार्गावर चालवली जाणार आहे. खरे तर या ट्रेनची अधिसूचना 15 मार्च 2024 ला निघाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेमुळे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवता आला नाही.
मात्र आता श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत ट्रेनला झेंडा दाखवणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
मुरी, बोकारो स्टील सिटी, चंद्रपुरा, धनबाद, चित्तरंजन, जामतारा, मधुपूर, जासीडीह, झाझा, गया, किउल, मोकामा, पटना साहिब, पटना, पाटलीपुत्र, दिघा, छपरा, सिवान, भटनी आणि देवरिया सदर या काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या वंदे भारत ट्रेनला थांबा मंजूर केला जाऊ शकतो असे देखील सांगितले जात आहे.
ही ट्रेन सुरू झाल्यास रांची ते गोरखपुर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या ट्रेनमुळे झारखंड आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल यात शंकाच नाही.