अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मंगळवारी, 23 जुलै 2024 ला लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर केंद्रातील सरकार पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहे. यामुळे अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. सर्वसामान्यांना देखील या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठी भेट देणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान आजचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर स्लीपर वंदे भारत आणि वंदे भारत मेट्रोला गती मिळेल असे बोलले जात आहे. खरे तरच सध्या स्थितीला भारतातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
सध्या सुरू असणारी वंदे भारत एक्सप्रेस ही चेअर कार प्रकारातील आहे. यातील शयनयान प्रकारातील गाडी अजूनही लॉन्च झालेली नाही. पण शयनयान वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च झाली पाहिजे अशी मागणी गेल्या 2-3 वर्षांपासून जोर धरत आहे. अशातच आता शयनयान वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही गाडी म्हणजेच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस लवकर लाँच होणार असे संकेत दिले होते.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत शिल्पा आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन लवकरच रुळावर येतील असे म्हटले होते. भारतीय रेल्वे सध्या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. गाड्यांची सुरक्षितता, स्थानकांचा विकास आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील. तिसऱ्या टर्ममध्ये वंदे भारतसोबतच स्लीपर वंदे भारत आणि वंदे भारत मेट्रो ट्रॅकवर उतरणार आहे.
निवडणुकीदरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत आणि वंदे भारत मेट्रो लवकरच रुळांवर आणणार असे म्हटले होते. हेच कारण आहे की आजच्या अर्थसंकल्पात या दोन श्रेणींसाठी काही मोठ्या घोषणा केल्या जातील, असे मानले जात आहे. दरम्यान, आज आपण वंदे भारत मेट्रो अन वंदे भारत स्लीपर ट्रेन कशी राहणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस :
वंदे भारतचे स्लीपर वर्जन लवकरच रुळावर येण्याची शक्यता आहे. पुढल्या महिन्यात ही गाडी रुळावर येण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे. तसेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते सिकंदराबाद यादरम्यान ही गाडी सुरू करावी अशी मागणी बोर्डाकडे केली आहे. यामुळे रेल्वे बोर्ड यावर काय निर्णय घेते याकडे देखील लक्ष राहणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शयनयान वंदे भारत एक्सप्रेसला १६ डबे राहणार आहेत.
राजधानीप्रमाणेच यात थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी कोच असतील. बर्थ, एअर डक्ट, केबल डक्ट, वॉशरूमचे डिझाइनही राजधानीपेक्षा वेगळे राहणार आहेत. या ट्रेनचा कमाल वेग १६० किमी एवढा राहणार आहे. प्रति तास असेल, जेणेकरून कमी वेळेत लांबचे अंतर कापता येणार आहे. वंदे भारतमध्ये जसा चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फरक आहे. तसेच थर्ड आणि सेकंड एसीच्या तुलनेत फर्स्ट एसीमध्ये प्रवाशांना अधिक सुविधा देण्यात येणार आहेत.
वंदे भारत मेट्रो ट्रेन :
वंदे भारत एक्सप्रेसची सुधारित आवृत्ती म्हणजे वंदे भारत मेट्रो ट्रेन. ही गाडी 100-200 किलोमीटर अंतरावरील शहरांना कनेक्ट करणार आहे. या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी 100 किमीच्या वेगाने धावणार आहे. सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसला शून्यावरून १०० किमीचा वेग गाठण्यासाठी ५२ सेकंदांचा कालावधी लागतो, परंतु वंदे भारत मेट्रोची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती ४५ ते ४७ सेकंदात शून्यावरून १०० किमीचा वेग गाठू शकणार आहे. म्हणजे ही गाडी अवघ्या काही सेकंदात टॉप स्पीड गाठू शकते. मात्र या गाडीचा कमाल वेग सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसपेक्षा म्हणजेच 160 किलोमीटर प्रतितास यापेक्षा कमी ठेवला जाणार आहे.