Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दाखल झाली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. ही गाडी रुळावर आली अन अवघ्या काही महिन्यातच रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने भारतीय रेल्वेने देशभरातील विविध महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
सध्या ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरु आहे. विशेष म्हणजे भविष्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. ही गाडी ज्या मार्गांवर धावत आहे तेथे या गाडीला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.
यामुळे गदगद झालेल्या भारतीय रेल्वेने आता या गाडीचे स्लीपर व्हर्जन बाजारात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याच स्लीपर वर्जन बाबत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर वर्जन गाडी आग्रा ते गोरखपुर दरम्यान चालवली जाणार आहे. गोरक्षनगरी अर्थातच गोरखपूर ते ताजनगरी म्हणजेच आग्रा फोर्ट रेल्वे स्थानक दरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी असल्याचे वृत्त समोर आले आहे.
एनईआरने याचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच महाव्यवस्थापकांनी याला सहमती सुद्धा दर्शवली आहे. 10 ते 12 एप्रिल दरम्यान जयपूर येथे होणाऱ्या IRTTC (इंडियन रेल्वे टाइम टेबल कमिटी) च्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केली जाईल.
वेळ सारणी समितीच्या बैठकीत या मार्गावरील सर्व रेल्वे झोन एनईआरने मांडलेल्या या ट्रेनच्या प्रस्तावावर विचारमंथन करतील. बैठकीत एकमत झाले तर जुलैमध्ये जाहीर होणाऱ्या वेळापत्रकात या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा समावेश केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
या बैठकीत गोरखपूर मुख्यालयातील ऑपरेशन विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या प्रस्तावानुसार ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
ही गाडी गोरखपूर ते आग्रा फोर्ट हा प्रवास फक्त दहा तासात पूर्ण करू शकणार आहे. गोरखपूर येथून सायंकाळी सात वाजता ही गाडी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता आग्रा येथे पोहोचेल.
तसेच आग्रा येथून ही गाडी सायंकाळी सात वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता गोरखपूरला पोहोचेल. सध्या या मार्गावर जी गाडी सुरू आहे त्या गाडीला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तेरा तासांचा कालावधी लागतो.
अर्थातच वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवासाच्या कालावधीत तीन तासांची बचत होणार आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनला बाराबंकी, ऐशबाग आणि कानपूर सेंट्रल या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाऊ शकतो.