Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस च्या आगमनानंतर खऱ्या अर्थाने कात टाकली आहे. वंदे भारत एक्सप्रेस मुळे देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच जलद झाला आहे. वंदे भारत ही सुपरफास्टपेक्षा वेगवान ट्रेन आहे. या वेगवान ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास कालावधी निम्म्याने कमी झाला आहे.
ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली. वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे संचालन सुरू झाले. सध्या स्थितीला देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील 11 मार्ग आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. दुसरीकडे वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत मेट्रो ट्रेन देखील सुरू करण्यात आली आहे.
वंदे भारत मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुज या दरम्यान सुरू करण्यात आली असून येत्या काही दिवसांनी या प्रकारची मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते मुंबई किंवा सुरत ते मुंबई या मार्गावर देखील सुरू होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
अशातच आता वंदे भारत मेट्रो ट्रेन नंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील धावणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइपचे अनावरण केले होते.
दरम्यान आता ही वंदे भारत स्लीपर ट्रेन पहिल्यांदा कोणत्या मार्गावर धावू शकते याबाबत नवीन अपडेट हाती आली आहे. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार असा दावा होऊ लागला आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही 2025 च्या सुरुवातीलाच रुळावर पाहायला मिळू शकते. पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे भाडेही निश्चित करण्यात आले आहे. ही ट्रेन अवघ्या 13 तासात 800 किलोमीटरचे अंतर कापणार आहे.
ही स्लीपर वंदे भारत ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक म्हणजेच यूएसबीआरएल प्रोजेक्ट अंतर्गत चालवली जाईल. ही ट्रेन दिल्लीहून संध्याकाळी ७ वाजता सुटेल आणि सकाळी ८ वाजता श्रीनगरला पोहोचेल.
एसी फर्स्ट, एसी सेकंड, एसी थ्री आणि स्लीपर कोचसह धावणार आहे. ही ट्रेन अंबाला कँट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्रीमाता वैष्णोदेवी कटरा, सांगलदान आणि बनिहाल स्टेशनवर थांबणार असे सुद्धा सांगितले गेले आहे.