Vande Bharat Express : भारतात वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरू होऊन जवळपास पाच वर्षांचा काळ उलटला आहे. 2019 मध्ये ही गाडी सर्वप्रथम रुळावर धावली होती.
तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील जवळपास 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या गाडीला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे.
ज्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे तेथील प्रवाशांचा प्रवास या गाडीमुळे गतिमान आणि सुरक्षित झाला आहे. या गाडीची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. हेच कारण आहे की,
देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवले जाणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2047 पर्यंत देशातील चार हजाराहून अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी चालवली जाणार अशी माहिती देखील दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये तर मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे. राज्यातही अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. सध्या राज्यातुन जाणाऱ्या सहा मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर आणि मुंबई ते गोवा या मार्गावर ही गाडी सुरू आहे. याशिवाय मुंबई ते जालना, मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते अहमदाबाद, पुणे ते वडोदरा या मार्गावर देखील या गाडीचे संचालन सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच आता नवीन वर्षापासून,
भगव्या रंगातील वंदे भारत एक्सप्रेस उत्तर मध्य रेल्वे (NCR) प्रयागराज झोनमधील आग्रा ते प्रयागराज दरम्यान सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही 11 डब्यांची वंदे भारत आग्राहून साडेचार तासात प्रयागराजला पोहोचणार आहे.
ही ट्रेन टुंडला, इटावा, कानपूर स्टेशनवर थांबणार आहे. आग्रा रेल्वे विभागाचे लोको पायलट आणि गार्ड ही गाडी चालवणार आहेत. सध्या या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास करण्यासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतो.
मात्र ही गाडी सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त साडेचार तासात पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे प्रयागराज येथे होणाऱ्या 2025 च्या कुंभमेळापूर्वीच या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. यामुळे आग्रा येथून कुंभमेळा साठी जाणाऱ्या भाविकांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.