Vande Bharat Express : भारतीय रेल्वेला स्वातंत्र्यपूर्वीपासूनचा इतिहास लाभला आहे. रेल्वे हे देशातील दळणवळणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात सर्वाधिक आहे. बस, खाजगी वाहने, विमान यापेक्षाही देशात रेल्वेने प्रवास करण्यास अधिक पसंती दाखवली जाते. याचे कारणही तसे खासच आहे. देशात अगदी कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे.
यामुळे देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याला जायचे असले तर रेल्वे सारखा दुसरा पर्याय शोधूनही सापडणार नाही. दरम्यान भारतीय रेल्वे देखील आपल्या रेल्वे प्रवाशांसाठी कायमच विविध सुविधा उपलब्ध करून देते. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना जलद आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन सुरू केली आहे.
ही ट्रेन सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांमध्ये या गाडीची मागणी वाढली. या गाडीने जलद आणि आरामदायी प्रवास होत असल्याने विविध मार्गावर ही गाडी सुरू केली जात आहे. आतापर्यंत देशातील 25 मार्गावर ही गाडी सुरू झाली असून आपल्या महाराष्ट्राला देखील पाच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
विशेष बाब अशी की महाराष्ट्रात सुरू असलेल्या या पाचही गाड्यांना प्रवाशांनी तुफान प्रतिसाद दाखवला आहे. विशेषतः मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, नागपूर-बिलासपूर या तीन मार्गावरील गाड्यांना सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब अशी की अलीकडेच सुरू झालेल्या मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला देखील नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद दाखवला आहे.
यामुळे रेल्वे विभाग गदगद आहे. दरम्यान या चालू महिन्यात अर्थातच जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील आणखी चार महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण भारतीय रेल्वे कोणत्या चार नवीन मार्गावर ही गाडी सुरू करणार आहेत याबाबत अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, या महिन्यात भारतीय रेल्वे ज्या चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे त्या गाड्यांचे रेक हे भगव्या रंगाचे राहणार आहेत. दिल्ली ते चंदीगड, चेन्नई ते तिरूनलवेली, ग्वालियर ते भोपाल आणि लखनऊ ते प्रयागराज या चार महत्त्वाच्या मार्गावर आता या महिन्याअखेरपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत.