Vande Bharat Express Train : येत्या दोन दिवसात अर्थातच सोमवारपासून महाराष्ट्रातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान याच हिवाळी अधिवेशनासाठी खानदेशातील धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव दिल्लीत उपस्थित आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव दिल्लीत यावेळी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेत उपस्थित करत आहेत. तसेच त्यांनी धुळ्यातील रेल्वे संदर्भातील प्रश्नाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची देखील नुकतीच भेट घेतली आहे.
यावेळी खासदार शोभा बच्छाव यांनी धुळ्याहून मुंबई आणि पुण्यासाठी वंदे भारत सुरू करावी अशी मागणी उपस्थित केली आहे. धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करा अशी मागणी खासदार बच्छाव यांनी यावेळी केली असून याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहे.
महत्त्वाचे म्हणजे खासदार बच्छाव यांच्या या मागणीवर आणि निवेदनावर केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही सुद्धा दिलेली आहे.
यामुळे आगामी काळात पुणे ते धुळे आणि मुंबई ते धुळे अशी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार अशी आशा पल्लवीत झाली असून या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर नक्कीच उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यासाठी ही एक मोठी आनंदाची बाब राहणार आहे.
खानदेशातील एक धुळ्याच्या एकात्मिक विकासाला वंदे भारत एक्सप्रेसमुळे नक्कीच चालना मिळणार आहे. कृषी, उद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्राला रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.
खासदार शोभा बच्छाव यांनी उपस्थित केलेली मागणी नवीन वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिल्याची माहिती खासदार बच्छाव यांनी दिली आहे. अर्थातच, 2025 मध्ये धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसणार आहे.
सध्या महाराष्ट्रातून किती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत ?
सध्या देशात 65 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात 11 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी अर्थात 2025 मध्ये धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई या मार्गावर देखील ही गाडी सुरू होऊ शकते. म्हणजे आगामी काळात महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आणखी वाढणार आहे.