Vande Bharat Express : 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू झाली. सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही गाडी सुरू झाली आणि या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास खूपच जलद झाला. परिणामी प्रवाशांनी तिकीट दर अधिक असतानाही या गाडीला चांगला प्रतिसाद दाखवला. या गाडीचा वेग आणि या गाडीत असणाऱ्या सोयीसुविधा प्रवाशांना विशेष आकर्षित करत आहेत यात शंकाच नाही.
हेच कारण आहे की वेगवेगळ्या मार्गांवर या गाडीला सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. यानुसार आत्तापर्यंत देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन सूरु झाली आहे. विशेष म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांव ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे भविष्यात आणखी अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. परंतु तुम्हाला देशातील 51 मार्गांवर सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस पैकी सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन कोणती आहे याविषयी माहिती आहे का? नाही, चला मग आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
देशातील सर्वाधिक वेगवान टॉप 5 वंदे भारत एक्सप्रेस
नवी दिल्ली ते वाराणसी : ही ट्रेन देशाची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन म्हणून ओळखली जाते. 2019 मध्ये या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही वंदे भारत एक्सप्रेस देशातील सर्वात वेगवान ट्रेन असल्याचे म्हटले जाते.
ही ट्रेन दिल्ली ते वाराणसी दरम्यानचे ७७१ किलोमीटरचे अंतर अवघ्या ८ तासात पूर्ण करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या ट्रेनचा सरासरी वेग ताशी 96.37 किलोमीटर एवढा आहे.
हजरत निजामुद्दीन ते राणी कमलापती : हजरत निजामुद्दीन ते राणी कमलापती रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी ही एक्सप्रेस देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वेगवान वंदे भारत ट्रेन आहे. ही गाडी 700 किलोमीटरचे अंतर साडेसात तासात पूर्ण करते. या ट्रेनचा सरासरी ताशी वेग हा 95.89 किलोमीटर एवढा आहे.
चेन्नई ते कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस : दक्षिण भारतातील ही ट्रेन सर्वाधिक जलद ट्रेन म्हणून ओळखली जाते. चेन्नई ते कोईम्बतूर हा 497 किलोमीटर लांबीचा प्रवास ही गाडी फक्त आणि फक्त पाच तास आणि 50 मिनिटात पूर्ण करते. ही गाडी सरासरी 90.36 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे.
सिकंदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेस : ही दक्षिण भारतातील आणखी एक महत्त्वाची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देशातील चौथ्या क्रमांकाची सुपरफास्ट वंदे भारत आहे. ही गाडी साडेआठ तासात 699 किलोमीटरचा प्रवास करते. या गाडीचा सरासरी वेग 84.21 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. गतीच्या बाबतीत ही चौथ्या क्रमांकाची गाडी आहे.
दिल्ली ते अंदौरा वंदे भारत एक्सप्रेस : राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते हिमाचल प्रदेश मधील अंदौरा या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन म्हणून ओळखली जात आहे. या गाडीचा एव्हरेज स्पीड हा 84.85 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. ही गाडी पाच तास आणि पंधरा मिनिटात 437 किलोमीटर लांबीचा प्रवास पूर्ण करते.