Vande Bharat Express : गेल्या काही वर्षात रेल्वे वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली होती.
तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे ज्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे तेथील प्रवाशांनी या गाडीला चांगला प्रतिसाद देखील दाखवला आहे.
परिणामी देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू करण्याचा निर्धार भारतीय रेल्वेने केला आहे. अशातच राज्यातील खानदेश विभागासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील खानदेश विभागातील भुसावळ रेल्वे स्थानकाला देखील आता वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावरूनही येत्या एका वर्षभरात वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात सात मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आता लवकरच 14 वर पोहोचणार आहे. कारण की राज्याला नवीन सात वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे वृत्त नुकतेच समोर आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार राज्यातील मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिंकदराबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे.
येत्या एका वर्षाभरात या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. विशेष बाब अशी की पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या वंदे भारत एक्सप्रेस भुसावळ मार्गे चालवल्या जाणार आहेत.
भुसावळ हे या मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. यामुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा देखील दिला जाईल अशी शक्यता आहे. परिणामी खानदेश मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.