Vande Bharat Express New Route : भारतीय रेल्वे देशातील रेल्वे प्रवाशांना लवकरच एक मोठी भेट देणार आहे. ती म्हणजे रेल्वे देशाला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहे. 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशाला 26व्या वंदे भारत एक्सप्रेसची मोठी भेट मिळू शकते असा दावा केला जात आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 मध्ये भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आली असून तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. प्रवाशांनी या गाडीला भरभरून असा प्रतिसाद दिला असून या गाडीची लोकप्रियता डे बाय डे वाढतच आहे.
गाडीची लोकप्रियता पाहता भारतीय रेल्वे देखील देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यासाठी आग्रही बनत चालले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, आगामी काही महिन्यात देशातील 40 महत्त्वाच्या मार्गावरील गाडी सुरू होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राला देखील काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
सध्या राज्यातील पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली असून आणखी काही मार्गावर ही गाडी धावणार आहे. सध्या राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात पुणे ते सिकंदराबाद दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून मुंबई ते कोल्हापूर मार्गावर देखील या गाडीला सुरू करण्याचे नियोजन आखले जात आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान ही गाडी चालवण्यासाठी नुकताच सर्वे देखील करण्यात आला होता.
पण या मार्गावर ही गाडी चालू करण्याचा निर्णय हा रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातूनच घेतला जाणार आहे. यामुळे आता मुंबई ते कोल्हापूर दरम्यान ही गाडी धावते की नाही हे रेल्वे मंत्रालयच ठरवणार आहे. अशातच मात्र 15 ऑगस्ट रोजी देशातील एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार अशी माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
कोणत्या मार्गावर धावणार 26 वी वंदे भारत एक्सप्रेस?
मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार राजस्थान येथील उदयपूर ते जयपूर दरम्यान 26वी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते. या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसचे ट्रायल उद्या अर्थातच 13 ऑगस्ट 2023 रोजी घेतले जाणार असून ही गाडी 15 ऑगस्ट पासून या मार्गावर नियमित धावू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
मात्र, रेल्वेने अद्याप याची औपचारिक घोषणा केलेली नाही. तथापी वंदे भारत एक्सप्रेस ट्रायल रनसाठी उदयपूरला पोहोचली आहे. दरम्यान ही गाडी सुरू झाली तर राजस्थानची ही तिसरी वंदे भारत ट्रेन राहणार आहे.
या वर्षी एप्रिलमध्ये राज्यातील पहिली ट्रेन अजमेर ते दिल्ली कॅन्टपर्यंत धावली होती. दुसरी ट्रेन जोधपूर ते साबरमती दरम्यान गेल्या महिन्यात चालवण्यात आली होती. आता उदयपूर ते जयपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा प्लॅन आहे.
उदयपूर जयपूर वंदे भारत एक्सप्रेसला कुठे थांबे राहणार?
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीला मावळी, चंदेरिया, भिलवाडा आणि अजमेर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. उद्या ट्रायल रनसाठी ही गाडी उदयपूरपासून सकाळी 8.10 वाजता निघेल आणि दुपारी 2.10 वाजता जयपूरला पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासात ही ट्रेन जयपूरहून दुपारी 4 वाजता निघेल आणि रात्री 10 वाजता उदयपूरला पोहोचणार आहे.
या ट्रेनमुळे राजस्थानच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. यासोबतच उदयपूरच्या पर्यटनालाही नवी दिशा मिळणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्याने अधिकाधिक लोक उदयपूरला पर्यटनासाठी येऊ शकतील, असा विश्वास पर्यटन क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.