Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी आहे. खरंतर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील विविध मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. सध्या देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राला आणखी दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे वृत्त समोर आले आहे.
सध्या महाराष्ट्रात आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत. सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अशातच आता महाराष्ट्राला 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर येथे आयोजित एका प्रचार सभेत कोल्हापूरला लवकरच वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असे म्हटले होते.
यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती दिली.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार अशी माहिती दिली आहे. याशिवाय मीडिया रिपोर्ट मध्ये मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देखील तिसरी वंदे भारत ट्रेन सुरू होणार असा दावा करण्यात आला आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सध्या दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या दोन वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावर धावत आहेत.
आता लवकरच या मार्गावर तिसरी वंदे भारत धावताना दिसणार आहे. या मार्गावर चालवण्यात येणारी पुढील वंदे भारत स्पेशल खूपच खास राहणार आहे. या आगामी वंदे भारतचा वेग ताशी १६० किमी एवढा राहील असे बोलले जात आहे.
या वंदे भारतची तिसरी आणि शेवटची चाचणी पूर्ण होण्यात आहे. ही अत्याधुनिक ट्रेन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली होती आणि अलीकडेच तिची 15000 किमी चाचणी सुरू झाली आहे. या वंदे भारतामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
ही नवी वंदे भारत ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवल्यास प्रवाशांचा ४५ मिनिटाचा वेळ वाचणार आहे. या मार्गावरील प्रवासासाठी सध्या अंदाजे 5 तास आणि 25 मिनिटे लागतात. मात्र नवीन वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
ही गाडी जून किंवा जुलै महिन्यात सुरु होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे. म्हणजे मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आणि मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.