Vande Bharat Express : 2019 मध्ये भारतीय रेल्वेच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस सामील झाली. सुरुवातीला दिल्ली ते वाराणसी या मार्गावर या गाडीला सुरु करण्यात आले. तेव्हापासून ते आत्तापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवले जात आहे. विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात देशातील नऊ महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालवण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे.
याचाच अर्थ येत्या काही महिन्यात भारतातील वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या गाड्यांची संख्या 25 वरून वाढून तब्बल 34 एवढी होणार आहे. वास्तविक ही गाडी रेल्वे प्रवाशांमध्ये खूपच लोकप्रिय बनली आहे. अल्पावधीतच या गाडीने रेल्वे प्रवाशांमध्ये आपली लोकप्रियता वाढवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या गाडीने प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास करता येत आहे.
या गाडीत मिळणाऱ्या सोयी सुविधा देखील खूपच टॉप क्लास आहेत. हेच कारण आहे की ही गाडी रेल्वे प्रवाशांमध्ये कमी दिवसातच लोकप्रिय बनली. पण असे असले तरी या गाडीवर अनेकांकडून टीका देखील होत आहे. अनेक लोकांकडून ही गाडी केवळ आणि केवळ श्रीमंतांसाठी सुरू झाल्याचा आरोप केला जात आहे.
याचे कारण म्हणजे या गाडीचे तिकीट दर हे इतर गाड्यांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. यामुळे आता सर्वसामान्य लोकांसाठी भारतीय रेल्वे नवीन वंदे भारतची निर्मिती करणार असल्याचे समोर आले आहे. या नवीन वंदे भारत गाडीला वंदे साधारण ट्रेन असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या वंदे साधारण ट्रेनचा स्पीड हा वंदे भारत एक्सप्रेस सारखाच राहणार आहे.
एवढेच नाही तर या साधारण ट्रेनमध्ये एसी वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे अनेक सुविधा देखील राहणार आहेत. मात्र ही नवीन साधारण ट्रेन नॉन एसी राहणार आहे. एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, ज्याप्रमाणे शताब्दी एक्सप्रेसच्या धरतीवर जनशताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेस च्या धरतीवर वंदे साधारण ट्रेन सुरू केली जाणार आहे.
खरंतर शताब्दी एक्सप्रेसचे तिकीट दर हे अधिक होते, यामुळे सर्वसामान्यांसाठी जनशताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली. आता वंदे भारत एक्सप्रेसबाबतही तसेच केले जात आहे. रेल्वेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन बनवण्याची प्रक्रिया इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे सुरू झाली आहे.
येत्या काही महिन्यांत हे कोचं तयार होणार आहेत. यात सर्व द्वितीय श्रेणीचे डबे राहणार आहेत. त्यामुळे त्याचे भाडेही कमी असणे अपेक्षित आहे. यावर्षी अखेरपर्यंत ही वंदे साधारण ट्रेन सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होईल असा आशावाद देखील काही रिपोर्ट मधून समोर येत आहे. यामुळे आता ही गाडी केव्हा सुरू होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.