Urea Fertilizer Rate : देशभरातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामापूर्वी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरतर, सध्या खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी खरिपातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण देखील झाली आहे.
सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या पिकांची काढणी पूर्ण झाली असून आता नवीन शेतमालाची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळत आहे. मात्र नवीन शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. कापूस आणि सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये. यामुळे शेतकरी बांधव सध्या संकटात सापडले आहेत. दरम्यान नवीन रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आता पैशांची निकड भासणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना नाईलाजाने नवीन शेतमाल विक्री करावा लागत आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे केंद्र सरकारने खतांवर अनुदान जाहीर केले आहे. रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने खतांवर अनुदान जाहीर केले असून हे अनुदान एक ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान आता आपण केंद्र शासनाने कोणत्या खतांसाठी किती अनुदान जाहीर केले आहे आणि या नवीन निर्णयामुळे आता शेतकरी बांधवांना खतांची बॅग किती रुपयाला मिळणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खताच्या प्रकारानुसार किती अनुदान मिळणार?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे, नायट्रोजन (युरिया)- 47.02 रुपये प्रति किलो, फॉस्फरस – 20.82 रुपये प्रति किलो, पोटॅश – 2.38 रुपये प्रति किलो, सल्फर – 1.89 रुपये प्रति किलो इतके अनुदान केंद्र शासनाकडून दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामासाठी अनुदानित खतांचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयानुसार आता डीएपीची एक बॅग १३५० रुपयाला मिळणार आहे. तसेच एनपीके खताची एक बॅग 1470 रुपयाला मिळणार आहे.