Tur Rate : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांची लागवड केली जाते. या पिकांची लागवड खरीप हंगामात होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिके शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला आणि कापसाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.
यामुळे या पिकाची शेती शेतकऱ्यांना परवडत नाहीये. अक्षरशः पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आले आहेत. दुसरीकडे तुरीचे पीक मात्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
कारण की बाजारात तुरीला चांगला विक्रमी दर मिळतोय. दरम्यान देशभरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरे तर सध्या संपूर्ण देशभरात तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. गेल्या महिन्यात तूर डाळीच्या बाजारभावात तब्बल दहा टक्क्यांची वाढ नमूद करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना नजीकच्या भविष्यात या पिकातून आणखी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. सध्या बाजारपेठेत तुरीला हमीभावापेक्षा दुप्पट दर मिळत आहे.
केंद्रातील मोदी सरकारने या चालू हंगामात तुरीसाठी सात हजार रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. पण, सध्या बाजारात यापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. साहजिक याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या Agmarknet पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी अर्थातच 13 एप्रिलला गुजरातच्या बिशनपूर आणि लमलाँग बाजारपेठेत तूर डाळीला विक्रमी बाजार भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये तुरीला चक्क 18000 रुपये प्रति क्विंटलं असा भाव मिळाला असल्याची माहिती या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे हा या चालू हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक भाव राहिला आहे.
याशिवाय, उत्तर प्रदेशातील चौरीचौरा बाजारात १५००० रुपये, आग्राला १४२००, मथुरा येथे १४००० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे आपल्या राज्यातील बाजारांमध्ये देखील तुरीचे दर तेजीत आले आहेत.
राज्यातील बाजारात सुद्धा तुरीला 13000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा विक्रमी भाव मिळू लागला आहे. देशांतर्गत तुरीला सरासरी साडे आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव नमूद केला जात आहे. यामुळे देशभरातील तुर उत्पादकांना या भाव वाढीचा मोठा फायदा होणार आहे.