Tur Crop Management : राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस समवेतच तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तूर हे एक एक प्रमुख डाळीवर्गीय पीक आहे. खरीप हंगामात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश अशा विविध विभागांमध्ये या पिकाची शेती आपल्याला पाहायला मिळते.
यावर्षीही तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. सध्या स्थितीला खरीप हंगामातील तुरीचे पीक फुलोरा अवस्थेत आहे तर काही ठिकाणी पिकाला शेंगा लागण्याची अवस्था आहे. म्हणजेच तुरीचे पीक आता महत्त्वाच्या अवस्थेत आहे. या अशा महत्वाच्या अवस्थेत जर पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते.
यंदा मात्र या अशा महत्त्वाच्या अवस्थेतच तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील तुर उत्पादक शेतकरी चांगलेच चिंतेत आले आहेत. मात्र जर शेंगा पोखरणाऱ्या अळीवर योग्य पद्धतीने आणि वेळेवर नियंत्रण मिळवले तर तुर पिकातील नुकसान बऱ्यापैकी कमी केले जाऊ शकते. यामुळे आज आपण तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींवर कशा पद्धतीने नियंत्रण केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.
कसे मिळवणार नियंत्रण ?
शेंगा पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तूर पिकात हेक्टरी 10 कामगंध सापळे बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे अळीवर नियंत्रण तर मिळवता येतेच शिवाय सर्वेक्षणास देखील मदत होते.
तसेच प्रती हेक्टरी 20 पक्षीथांबे बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पक्षी शेंगा पोखरणाऱ्या आळ्या वेचून खातात यामुळे पक्षी थांबे बसवणे जरुरीचे आहे.
तसेच सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव कमी असेल तर ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
तसेच किडीचा जर जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर रासायनिक पद्धतीने यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल १८.५ एस २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट ५ एस जी ४.४ ग्रॅम किंवा लॅम्बडा-सायलोथ्रिन ५ ई सी १० मिली किंवा फ्लूबेंडामाईड ३९.३५ एस सी २ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारण्याचा सल्ला देण्यात आला आहे.