Tomato Farming : गेल्या वर्षी अर्थातच 2023 ला बाजारात टोमॅटोला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. 2500 रुपये प्रति कॅरेट पर्यंत टोमॅटो विकले जात होते. यातून काही शेतकऱ्यांनी 1-2 कोटींचा टर्नओव्हर केला. त्यांना पिकासाठी आलेला खर्च काढून चांगला आर्थिक फायदा झाला. दरम्यान यंदाही तसाच विक्रमी भाव मिळेल अशी भोळी-भाबडी आशा शेतकऱ्यांना आहे.
यामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये टोमॅटो लागवडीची लगबग पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील ओतूर, माळशेज व आजूबाजूच्या परिसरात टोमॅटो लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळतं आहे. खरे तर सध्या टोमॅटोच्या 20 किलो कॅरेटला अवघा 200 ते 225 रुपयाचा भाव मिळतो.
या बाजारभावाचा विचार केला असता टोमॅटो पिकासाठी जो खर्च येतोय तो देखील भरून काढता येणार नाही. पण, भविष्यात भाव वाढ होईल अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना आहे. गेल्या मार्च महिन्यापासून शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत अनेकांनी टोमॅटोची लागवड केली आहे. तसेच एप्रिल अखेरपर्यंत टोमॅटोची लागवड सुरूच राहणार आहे. दरम्यान, आज आपण टोमॅटोच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टोमॅटोचे संकरित वाण
फुले राजा : टोमॅटोचा हा एक प्रमुख संकरित वाण आहे. या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 180 दिवसात पीक परिपक्व होत असते. टोमॅटोसाठी घातक ठरणाऱ्या फळे पोखरणारी अळी आणि विषाणूजन्य रोगास या जातीचे पीक प्रतिकारक असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.
फुले राजा या संकरित टोमॅटो जातीपासून एका हेक्टर क्षेत्रातून 55 ते 60 टन एवढे विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. टोमॅटोचा हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाने विकसित केला आहे.
फुले केसरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केलेला फुले केसरी हा देखील एक लोकप्रिय प्रकार आहे. या जातीची महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. राज्यातील हवामानास अनुकूल असल्याने या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
या जातीच्या फळांचा रंग केसरी असतो. यामुळे याला फुले केसरी असे नाव देण्यात आले आहे. टोमॅटोची ही जात विषाणूजन्य रोगास मध्यम प्रतिकारक असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. या जातीपासून हेक्टरी 55 ते 57 टन एवढे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळत आहे.
फुले जयश्री : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला चेरी टोमॅटोचा हा वाण शेतकऱ्यांमध्ये फारच लोकप्रिय आहे. ज्या शेतकऱ्यांना चेरी टोमॅटोची लागवड करायची असेल ते शेतकरी बांधव या जातीची निवड करू शकतात.
या जातीपासून एका हेक्टर क्षेत्रातून 50 ते 55 टन एवढे उत्पादन मिळू शकते. ही जात विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक असल्याचे कृषि तज्ञांनी सांगितले आहे.