Tomato Farming : टोमॅटोला देशात बारा महिने मागणी पाहायला मिळते. त्यामुळे या पिकाची देशात मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. या देशात उत्पादित होणारे एक प्रमुख फळ भाजीपाला पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेष म्हणजे नुकत्याच काही महिन्यांपूर्वी बाजारात टोमॅटोला विक्रमी भाव मिळाला होता.
त्यामुळे त्यावेळी शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील झाली होती. त्यानंतर मात्र टोमॅटोचे बाजार भाव कमालीचे गडगडले आहेत. यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. तथापि टोमॅटोची अनेक भागात मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे.
दरम्यान आज आपण टोमॅटोच्या शेती बाबत एका महत्त्वाच्या समस्येबाबत जाणून घेणार आहोत. आज आपण टोमॅटो पिकातील होणारी फुलगळ रोखण्याचे उपाय थोडक्यात समजून घेणार आहोत. खरेतर या पिकातून चांगले उत्पादन मिळते मात्र अनेकदा फुलगळ झाल्याने उत्पादनावर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो.
त्यामुळे टोमॅटो पिकातील फुलगळ वेळेवर रोखली गेली तर शेतकऱ्यांना अधिकची कमाई होण्याची आशा असते.कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे टोमॅटो पिकात फुलगळ होण्याची अनेक कारणे आहेत यामध्ये वातावरणातील बदल हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.
वातावरणात बदल झाल्यास टोमॅटोच्या झाडावर ताण येतो आणि याचा परिणाम म्हणून फुलगळ मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय जर पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य कमी भेटलेले असतील आणि बोरॉनची कमतरता असेल तरीसुद्धा फुलगळ होऊ शकते.
एवढेच नाही तर पाणी व्यवस्थापन करताना काही चूक झाली म्हणजेच पाण्याचे अनियमित नियोजन राहिले तरीसुद्धा फुलगळ होते.याशिवाय रस शोषक किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला तर अशा प्रकरणांमध्ये देखील फुलगळ पाहायला मिळते.
जर नत्रयुक्त खतांचा अधिक वापर झाला आणि रासायनिक कीटकनाशकांची अधिक फवारणी केली तर पिकावर मधमाशा येत नाहीत आणि यामुळे परागीभवन व्यवस्थित होत नाही आणि साहजिकच हे देखील फुलगळ होण्यास एक महत्त्वाचे कारण ठरते.
यामुळे फुलगळ होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागवडीपासूनच मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर केला पाहिजे.
पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. संजीवके देताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे. संजीवके तज्ञांच्या सल्ल्यानेच दिली पाहिजे. तसेच फुलगळ रोखण्यासाठी एका फवारणीची देखील शिफारस करण्यात आली आहे.
कृषी तज्ञांनी मॅग्नेशियम अडीच ग्रॅम, झिंक अडीच ग्रॅम, बोरॉन एक ग्रॅम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फवारणी करण्यापूर्वी मात्र कृषी तज्ञांचा आणि कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.