Maharashtra Rain : मान्सून काळात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली होती. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात फक्त 88 टक्के एवढा पाऊस झाला. म्हणजेच सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र मान्सूनोत्तर अवकाळी पावसाने महाराष्ट्राला चांगलेचं झोडपले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि काही भागात गारपीट झाली.
यामुळे अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. शेती पिकांवर याचा मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला. म्हणून अवकाळी पावसाला शेतकरी बांधव कंटाळलेत. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे गेल्या महिन्याच्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने सर्वात जास्त नुकसान केले.
विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे सांगितले जात होते. पण डिसेंबरची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. पण या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाचा जोर हा कमी होता. शिवाय आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे.
राज्यातील ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळले आहे. शिवाय राज्यात गारठा वाढू लागला आहे. अशातच मात्र आता भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 17 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकण विभागातील दक्षिण भागात आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता निवळून गेली आहे. पण नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. यामुळे कालपर्यंत राज्यात पहाटेच्या वेळी जाणवणार गारठा काही भागातून गायब होण्याची शक्यता आहे.
आज कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अर्थातच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील सातारा, सांगली, कोल्हापूर तीन जिल्ह्यात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यात जर पाऊस झाला तर तेथील शेती पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे सांगितले जात आहे.