सध्या जर आपण विविध पिकांच्या बाबतीत पाहिले तर केंद्र सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांना मारक असल्याचे दिसून येत आहे. जर आपण कांद्याचे उदाहरण घेतले तर गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याने शेतकऱ्यांना रडवले असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील कांदा पिकाच्या माध्यमातून निघालेला नाही.
आता मागील काही दिवसांपासून कांद्याला बऱ्यापैकी बाजार भाव मिळायला लागलेला होता. त्यातच केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केल्यामुळे कांद्याचे दर निम्म्यापेक्षा जास्त घसरले आहेत. शहरी ग्राहकांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र केंद्र सरकारचे अशा प्रकारचे निर्णय शेतकऱ्यांना खूपच नुकसानदायक ठरताना दिसून येत आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्या ग्राहकांसाठी सरकारकडून अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत त्या निर्णयाचा फायदा ग्राहकांना तरी पुरेसा मिळत आहे का हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. याकरिता केंद्र सरकारने एनसीसीएफ च्या माध्यमातून स्वस्तामध्ये कांदा तसेच डाळी आणि मैदा देण्याचे काम सुरू केले आहे.
एवढेच नाही तर ग्राहकांना दिलासा मिळावा याकरिता एनसीसीएफच्या माध्यमातून होम डिलिव्हरीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पिकांसाठी खर्च करून देखील शेतकऱ्यांना जेव्हा चांगला दर मिळाला लागतो तेव्हा सरकार असे दर कमी करण्यासाठी निर्णय का घेते? हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा पुरवला जात आहे या भावाने
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नॅशनल कंज्यूमर को-ऑपरेटिव फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एनसीसीएफ नाशिक मध्ये 25 रुपये किलो कांदा, साठ रुपये किलो डाळ आणि 27.50 रुपये किलो दराने मैदा विकत आहे. याकरिता 15 मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आलेले आहेत. एवढेच नाही तर देशातील दिल्ली, कोलकाता तसेच पाटणा, बेंगलुरु, मुंबई आणि आता नाशिक अशा 114 शहरांमध्ये एक हजार एकशे पंचावन्न मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून स्वस्त वस्तूंची विक्री करण्यात येत आहे.
आतापर्यंत एनसीसीएफच्या माध्यमातून एक लाख साठ हजार तीनशे नव्वद मॅट्रिक टन कांद्याची विक्री झाल्याचे देखील सांगण्यात आले. परंतु ही सुविधा सर्व ठिकाणी अद्याप उपलब्ध नाही. यामध्ये सामान्य शेतकऱ्यांकडून एनसीसीएफ खरेदी केलेला माल साठवून ठेवते व या मोबाईल व्हॅनद्वारे हा माल ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी नेला जातो. परंतु ह्या व्हॅन अनेक भागांमध्ये अद्याप पोहोचल्या नसल्याचं सध्या चित्र आहे.
ग्राहकांना मात्र 25 रुपये किलो दराने कांदा मिळेल याची प्रतीक्षा आहे. एकट्या नाशिक शहराचा विचार केला तर या ठिकाणी 15 मोबाईल व्हॅन वितरणासाठी फिरणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. एकाच व्हॅनमध्ये कांदे तसेच डाळी आणि मैदा असणार आहे.
या मोबाईल व्हॅन शहरातील प्रत्येक भागात फिरणार असून प्रत्येक ग्राहकाचे नाव व मोबाईल क्रमांक हा व्हॅनवर असणाऱ्या कर्मचाऱ्याकडून नोंदवला जाणार आहे. या सर्व गोष्टी ग्राहकांना महिन्यातून दोनदा मिळतील. परंतु सगळीकडेच ही सुविधा मात्र दिसून येत नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील नाराजी पसरण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
एनसीसीएफ ग्राहकांना स्वस्तामध्ये कांदा, डाळी आणि मैदा विकण्याचे काम करत आहे. एनसीसीएफ च्या माध्यमातून ग्राहकांना होम डिलिव्हरीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे व त्यामुळे शेतकरी आता संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांना जेव्हा चांगला दर मिळायला लागतो तेव्हा सरकार दर कमी करते. एनसीसीएफ मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे व या योजनेमुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.