Tur Variety : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापूस या पिकांसमवेतचं तुरीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तूर हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तथा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे.
याची बहुतांशी शेतकरी बांधव मिश्र पीक पद्धतीत लागवड करतात. म्हणजे तुरीची लागवड ही आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष बाब अशी की, गेल्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या तुरीला बाजारात चांगला भाव देखील मिळाला आहे.
यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तूर लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता आहे. यंदा भारतीय हवामान खात्याने मान्सून काळात चांगला पाऊस राहणार असा अंदाज देखील व्यक्त केला आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी तुरीचे पीक फायदेशीर ठरू शकते.
तथापि या पिकातून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण तुरीच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या गोदावरी या तुरीच्या सुधारित जातीची माहिती पाहणार आहोत.
गोदावरी तुरीच्या जातीच्या विशेषता
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदावरी ही तुरीची सुधारित जात असून महाराष्ट्रातील हवामान या जातीस विशेष अनुकूल आहे. ही जात कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) ने विकसित केली आहे.
हा वाण अलीकडेचं प्रसारित करण्यात आला आहे. २०२१ मध्ये ही जात प्रसारित झाली आहे. ही जात पेरणीनंतर सरासरी 160 ते 165 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली आहे. या जातीची फुले ही मळकट पांढऱ्या रंगाची असतात.
तसेच, या जातीचे दाणे पांढऱ्या रंगाची असतात. पांढऱ्या तुरीची ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे या जातीपासून विक्रमी उत्पादन मिळत आहे. या जातीच्या 100 दाण्यांचे वजन हे जवळपास ११ ग्रॅम असते म्हणजेच वजनाला देखील हा वाण चांगला आहे.
या जातीचे पीक मर आणि वांझ रोगास प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जातीपासून 160 ते 165 दिवसात 19 क्विंटल ते 24 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याची माहिती कृषी तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.