Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील एक लोकप्रिय ट्रेन आहे. या ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी, शताब्दी यांसारख्या एक्सप्रेस ट्रेनला देखील वंदे भारत एक्सप्रेसने लोकप्रियच्या बाबतीत धोबीपछाड दिली आहे. ही हाय स्पीड ट्रेन कमाल 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. या गाडीमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. या गाडीमुळे प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येत आहे. परिणामी या गाडीला प्रवाशांनी विशेष पसंती दाखवली आहे.
हेच कारण आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्याचे नियोजन आखले जात आहे. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2047 पर्यंत संपूर्ण भारतात 4500 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मार्च 2024 पर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जातील असा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय रेल्वे बोर्डाने बिहार येथील पटना ते न्यू जलपाईगुडी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यास मंजुरी दिली आहे.
या गाडीचे वेळापत्रक देखील अंतिम झाले आहे. या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसमुळे सात तासात पूर्ण करता येणार आहे. यामुळे पटना ते न्यू जलपाईगुडी हा प्रवास गतिमान होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार जलपाईगुडी रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस पटनासाठी सकाळी ६ वाजता सुटणार आहे आणि दुपारी १ वाजता पाटण्याला पोहोचणार आहे. म्हणजे NJP अर्थातच न्यू जलपाईगुडी ते पाटणा हा प्रवास फक्त 7 तासांचा असेल. तसेच पाटणा येथून ही गाडी दुपारी 3 वाजता सुटेल आणि रात्री 10 वाजता आपल्या न्यू जलपाईगुडी येथे पोहोचेल. ही गाडी मंगळवार वगळता सर्व दिवस सुरू राहणार आहे. तथापि या गाडीचे उद्घाटन केव्हा होणार याची तारीख अजून समोर आलेली नाही. पण या गाडीचे उद्घाटन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार एवढं मात्र नक्की आहे.