Maharashtra Rain : एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता मे महिना देखील अवकाळी पाऊस चांगलाच गाजवणार असे चित्र दिसू लागले आहे. कारण की पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तर काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
विशेष म्हणजे राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी गारपीट झाली होती. अशातच आता आगामी पाच दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती कायम राहणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी दुष्काळात 13 वा महिना अशी परिस्थिती तयार होत असून या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान आगामी पाच दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी हळद, कांदा यांसारख्या आपल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवावी जेणेकरून त्यांच्या मालाचे नुकसान होणार नाही असे आवाहन जाणकार लोकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला असल्याने पशुधनाची देखील शेतकऱ्यांनां काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या भागात बरसणार वादळी पाऊस
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ विभागातील अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच आज गडचिरोली जिल्ह्यातही गारपीट होणार असे म्हटले गेले आहे.
उद्या अर्थातच 10 मे 2024 ला विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपीटीची शक्यता आहे. या कालावधीत वादळी वारे देखील वाहणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच सोमवार पर्यंत विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस राहणार असा अंदाज आहे. दुसरीकडे शनिवारी आणि रविवारी कोकणात सुद्धा पावसाची शक्यता तयार होत आहे.
खानदेश बाबत बोलायचं झालं तर खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पाऊस हजेरी लावणार असे चित्र आहे. एकंदरीत गेल्यावर्षी दुष्काळामुळे आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि या चालू वर्षातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.