Soybean Farming : यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती.
यंदा मात्र चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 2024 च्या खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता असून यंदा शेतकऱ्यांना या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन देखील मिळणार असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.
तथापि, सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान, आज आपण सोयाबीनच्या अशा काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की हेक्टरी 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया हेक्टरी 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देणारे सोयाबीनचे प्रमुख वाण कोणते आहेत आणि त्यांच्या अन्य विशेषता काय आहेत.
सोयाबीनच्या प्रमुख जाती आणि त्यांच्या विशेषता खालील प्रमाणे
जे. एस. -३३५ : महाराष्ट्रात उत्पादित होणारे हे एक प्रमुख वाण आहे. या जातीची राज्यातील अनेक शेतकरी बांधव लागवड करत आहेत. खरेतर सोयाबीनचा हा एक जुना वाण आहे. १९९४ मध्ये सोयाबीनची ही जात प्रसारित करण्यात आली आहे. तेव्हापासून या जातीची लोकप्रियता कायम आहे.
कृषी क्षेत्रातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोयाबीनचा हा प्रमुख वाण असून ९५-१०० दिवसांत या जातीचे पीक परिपक्व होत असते. ३८ × १० सेंमी अंतरावर याची लागवड केली जाऊ शकते. या जातीची मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास शेतकऱ्यांना 25 ते 28 क्विंटल पर्यंतचे सरासरी उत्पादन मिळू शकते असा दावा तज्ञांनी केला आहे.
जे. एस. – २०९८ : सोयाबीनची ही देखील एक प्रमुख जात आहे. सोयाबीनची ही जात २०१७-१८ मध्ये प्रसारित झाली आहे. म्हणजे ही जात देखील सात वर्षांपासून बाजारात उपलब्ध असेल. हे एक उंच वाढणारे वाण आहे. हार्वेस्टरने जर काढणी केली तरी चालते.
यामुळे जास्त क्षेत्र असणारे शेतकरी बांधव या जातीच्या पेरणीला पसंती दाखवतात. ९५-९८ दिवसांत ही जात परिपक्व होते. या जातीपासून शेतकऱ्यांना सरासरी २५ ते २८ क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
एम. ए.यू.एस. -७१ (समृद्धी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या कृषी विद्यापीठाने सोयाबीन ची समृद्धी ही सुधारित जात विकसित केली आहे. गेल्या 14 वर्षांपासून सोयाबीनची ही जात बाजारात उपलब्ध आहे. तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे सोयाबीनची ही जात ९५-१०० दिवसांत परिपक्व होत आहे. मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास यापासून 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येणे शक्य असल्याचा दावा केला जात आहे.