सासवड : पुरंदर तालुका नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जातो, तर तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाचे आगारच. कारण, या भागातील नागरिकांना केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. पावसाळा संपला की लगेच टँकरची तासन्तास वाट पाहावी लागते. अलीकडच्या काळात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून बर्यापैकी प्रगती झालेली दिसून येते. याच भागातील पिसवेच्या संतोष विनायक म्हस्के या युवा शेतकऱ्याने जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याच्या तयारीच्या जोरावर कुटुंबाच्या मदतीने विविध प्रकारची फळपिके घेऊन आदर्श निर्माण केला आहे. केवळ फळपिके घेऊन वर्षाला लाखो रुपये कमवत आहे.
पुरंदर तालुक्याच्या पिसर्वेतील प्रयोगशील शेतकरी संतोष विनायक म्हस्के यांना लहानपणापासून शिक्षक होण्याची आवड असल्याने त्यांनी डी.एड. करून पुढे एम.ए.चे शिक्षण घेतले. परंतु, प्रयत्न करूनही शिक्षकाची नोकरी न मिळाल्याने घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलोपार्जित साडेनऊ एकर क्षेत्र असून यामध्ये वाटाणा, कांदा, भाजीपाला ही पारंपरिक पिके घेतली जात होती. परंतु, एवढ्यावर फारसे उत्पन्न मिळत नसल्याने फळबाग लागवड करायची आणि या माध्यमातून आधुनिक पद्धतीने शेती करायची, असा निर्णय घेतला.
२०१५ साली छत्तीसगडमधून व्हीएनआर या जातीच्या पेरूची ‘पाहणी करून ४०० कलमांची लागवड केली. पेरूचे योग्यरितीने व्यवस्थापन करताना रासायनिक बरोबरच सेंद्रिय खतांच्या मदतीने तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन केले. दोन वर्षांत फळ धारणा होऊन पहिल्याच वर्षी एक लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले
सध्या ही झाडे आठ वर्षांची झाली असून एका फळाचे वजन ४०० ग्रॅमपासून ११०० ग्रॅमपर्यंत भरते. त्याला बाजारभाव सरासरी ५० ते ९० रुपयांपर्यंत मिळतो. वर्षाला ४०० ते ५०० क्रेटपासून सुमारे पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळते.
पेरूचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातून रत्नदीप या जातीच्या पेरूची २०० रोपे आणली. पेरू वरून हिरवा परंतु आतील गर लाल आणि चवीला गोड असल्याने त्याला स्थानिक आणि मुंबई बाजारपेठेत चांगली मागणी आहे. एका क्रेटला ५०० पासून ११०० रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतो. विशेष म्हणजे या पेरूचे वर्षात दोनदा बहार घेता येतात. या माध्यमातून सरासरी वर्षाला तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यानंतर कर्जतमधून तैवान पिंक जातीची ५५० पेरूची रोपे आणून लागवड केली. सध्या दोन वर्षांची झाडे झाली असून यंदा प्रथमच बहार आला आहे. प्रत्येक झाडाला किमान १० ते १२ किलो माल धरला असून फळ खराब होवू नये, यासाठी प्रत्येक फळाला फोम व प्लास्टिक पिशव्या लावून सुरक्षित केले आहे.पहिल्याच वर्षी दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा संतोष म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.
१५० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर
पेरूच्या बागेचे योग्य व्यवस्थापन आणि चांगला बाजारभाव मिळून उत्पन्न वाढले. तसेच, फळपिके घेण्याची खात्री लागली आहेत. प्रत्येक झाडावर पाच ते दहा किलो माल लागला असून त्यालाही पूर्णपणे सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. या पेरूचे वजन ३०० ते ११०० ग्रॅमपर्यंत होवून लाल रंगाचा गर खाण्यास त्यात गोड आणि विशेष झाल्याने आणखी नवीन जातीच्या पेरूची लागवड करायची म्हणून गुजरात राज्यातून गुजरात रेड या पेरूच्या नवीन जातीची ५०० रोपे शेतात लावली असून सध्या दीड वर्षाची झाडे झाली आहेत. त्यालाही यंदा प्रथमच बहार धरला असून त्याला चांगली फळे म्हणजे यात केवळ बिया अत्यंत कमी असतात. सध्या बाजारपेठेत या पेरूला मोठी मागणी आहे. ५० पासून १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत याला दर मिळतो, असेही संतोष म्हस्के यांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी डाळिंबाची एक हजार झाडे लावली असून त्यांचे दोन टप्पे केले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५०० झाडांचे हार्वेस्टिंग करण्यात येणार असून तीन, चार तोडे झाल्यानंतर दुसर्या टप्प्यात ५०० झाडांचे हार्वेस्टिंग सप्टेंबर अखेर करण्यात येईल. या माध्यमातून वर्षाला किमान एक हजार झाडांपासून सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळण्याची खात्री आहे. त्याचप्रमाणे सीताफळाची २०० झाडे लावली असून बाग पूर्णपणे फळांनी बहरली आहे. १५ दिवसांत फळांची तोडणी सुरू होईल, असे संतोष म्हस्के यांनी सांगितले.
शेताच्या बांधावरही वेगवेगळ्या प्रकारची झाडे
फळ बागेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करतानाच शेताच्या बांधावरही वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. यामध्ये नारळ, आंबा, जांभूळ, फणस अशी विविध प्रकारची झाडे लावून वर्षभर उत्पन्न सुरू राहील, अशी व्यवस्था केली आहे. तालुक्यात आदर्श अशी शेती केल्याचे पाहून पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी बाग पाहण्यासाठी आवर्जून येत असतात. यामध्ये त्यांना सासबडमधील कृषी मार्गदर्शक काकासो जगताप तसेच पिसर्वेतील राहुल कोलते यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्याचे संतोष म्हस्के यांनी सांगितले.
आई- वडिलांसह पत्नीची मदत
संतोष म्हस्के यांना शेती कामात त्यांची पत्नी प्रियांका म्हस्के, वडील विनायक म्हस्के, आई मंगल म्हस्के यांची मोलाची मदत मिळत असते. झाडांना पाणी देणे, खते, औषधे देणे, फळे तोडणे, त्यांचे प्रतवारी, पॅकिंग करणे ही सर्व कामे त्यांच्या सहकार्याने शकय होतात. विशेष म्हणजे फळे तोडल्यानंतर बाजारात न नेता जागेवरच व्यापारी खरेदी करून नेतात. तसेच, हा सर्व माल पुणे, मुंबई, बेंगलोर, वाशीतील बाजारपेठेत नेला जातो, असे संतोष म्हस्के यांनी सांगितले.
सध्या नोकर्या लागण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. केवळ शिक्षण घेऊन हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. अशा युवक, युवतींनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी करावा. योग्य नियोजन केल्यास फक्त फळपिकांच्या सहायाने वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल. त्यासाठी चिकाटी, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवून आधुनिक पद्धतीने शेती करावी.- संतोष म्हस्के, शेतकरी, फळे उत्पादक, पिसर्वे, ता. पुरंदर