Success Story : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या आव्हानांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट अशा वेगवेगळ्या संकटांमुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. यामुळे अनेक नवयुवक शेतकरीपुत्र आता शेती ऐवजी इतर उद्योगधंद्यांमध्ये उतरू लागले आहेत.
घरची शेती असतानाही आता शेतकरी पुत्र नोकरी करण्याला अधिक महत्व दाखवत आहेत. मात्र जर योग्य पद्धतीने शेतीमध्ये नियोजन केले गेले तर शेतकरी हा नोकरदारापेक्षा जास्तीची कमाई करू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील म्हाकवे या गावातील एका युवा शेतकऱ्याने हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे.
सतीश शिवाजी पाटील यांनी उसाच्या शेतीतून एकरी 120 टनाचा उतारा मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष बाब अशी की सतीश यांनी खडकाळ माळरानावर उसाची लागवड करून ही किमया साधली आहे. यामुळे सध्या त्यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्ष होत आहे.
जे लोक शेतीमध्ये काही दम नाही, शेती करून फक्त पोटाची भूक भागवता येऊ शकते असे बोलतात त्यांना या अवलीया शेतकऱ्याने चांगलीच चपराक लावली आहे. सतीश यांनी खरे तर कृषी पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना सहजतेने नोकरी मिळाली असती. परंतु नोकरी करण्याऐवजी काळ्या आईच्या कुशीत राहून शेती करणे त्यांना अधिक आवडले.
यामुळे त्यांनी नोकरी ऐवजी शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले. त्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि याच जोरावर त्यांनी आता एकरी 120 टन एवढे उसाचे दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. विशेष म्हणजे कागल तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणी उत्पादन घेतलेले आहे. यामुळे अनेकजण सतीश यांच्या शेतीला भेट देत आहेत.
कोणत्या जातीच्या उसाची केली लागवड
सतीश यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात को 86032 या ऊस वाणाचे बेणे लावले. त्याआधी जमिनीची योग्य पद्धतीने मशागत त्यांनी करून ठेवली होती. ऊस लागवड केल्यानंतर त्यांनी पुन्हा पाणी दिले. तीन महिन्यानंतर भरणी केली. तज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक खतांचा वापर केला. जिवाणू खते, बुरशीनाशके, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्य, संजीवके इत्यादीची फवारणी आणि आळवणी केली.
त्यांना एकरी एक लाख 15 हजार रुपये एवढा उत्पादन खर्च आला आहे. विशेष म्हणजे दोन लाख 93 हजाराचे त्यांना निव्वळ उत्पन्न या ठिकाणी मिळाले आहे. तसेच त्यांनी आता एकरी 140 टन पर्यंतचे उत्पादन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निश्चितच ते हे टार्गेट साध्य करणार यात शंकाच नाही.